मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 13, 2024 11:28 AM IST

Classical Singer Prabha Atre passed away: प्रख्यात शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचं आज वयाच्या ९०व्या वर्षी निधन झालं.

Prabha Atre (Pc: Swaramayi Gurukul)
Prabha Atre (Pc: Swaramayi Gurukul)

उस्ताद राशिद खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून संगीतविश्व सावरत असतानाच आज आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळं संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

पहाटे झोपेत असताना प्रभाताईंना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रभाताईंना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्यानं ते भारतात परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. प्रभाताईंचा शिष्य परिवार मोठा आहे. त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले अनेक कलाकार आज शास्त्रीय संगीतात योगदान देत आहेत. त्यांच्या स्वरसाधनेतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आज हा संपूर्ण परिवार पोरका झाला आहे.
वाचा: असे लोक कधीच मरत नाहीत! पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींकडून राशिद खान यांना

कोण होत्या प्रभा अत्रे?

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी वयाच्या ८व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरेटही केली. प्रभा अत्रे या प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून विशेष ओळखल्या जायच्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी आजवर ११ पुस्तके प्रकाशित करण्याचा जगविक्रम केला आहे. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.

प्रभा अत्रे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. "ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व हरपले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो" या शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग