मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली

Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 09, 2023 11:39 AM IST

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड कलाकार सतीश कौशिक यांच्या आठवणी शेअर करून, त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Satish Kaushik Passes Away
Satish Kaushik Passes Away

Satish Kaushik Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे आज (९ मार्च) निधन झाले. त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली. सतीश कौशिक यांचे दिल्लीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा मृतदेह सध्या गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात असून, पोस्टमॉर्टमनंतर मुंबईत आणण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक आपल्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीत आले होते, तिथे त्यांची प्रकृती खालावली होती.

सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड कलाकार सतीश कौशिक यांच्या आठवणी शेअर करून, त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील या बातमीने धक्का बसला आहे. ट्वीट करत तिने लिहिले की, ‘या भयानक बातमीने जाग आली.. ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते, एक अतिशय यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिकजी वैयक्तिकरित्या देखील एक अतिशय खरे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची नेहमीच आठवण येईल.’

सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्रासाठी कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही.’

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने देखील ट्वीट करत म्हटले की, ‘परिपूर्ण कॉमिक टायमिंग असलेला एक अद्भुत अभिनेता, एक अप्रतिम दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे एक नामांकित माजी विद्यार्थी. सतीश कौशिकजी तुम्ही फार लवकर आम्हाला सोडून गेलात..’

अभिनेता रणदीप हुडा याने म्हटले की, ‘तुम्ही आमच्या बालपणापासून आमच्या आयुष्याचा एक भाग आहात.. या मनोरंजनासाठी धन्यवाद सतीशजी.. ओम शांती’

IPL_Entry_Point

विभाग