'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळ्या सगळ्यांसाठी खास ठरतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या पुरस्कारात आणखी एक विभाग अॅड करण्यात आला आहे. आता हा विभाग कोणता जाणून घेऊया...
नव्या वर्षातील या पुरस्कारावर कोण नाव कोरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्रेक्षकांची पसंती कलाकारांना जेवढी महत्वाची असते तितकाचा सन्मान त्यांना समीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनातून मिळत असतो. त्यामुळे यंदा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कारांमध्ये एक नवा पुरस्कार दिला जाणार आहे. समीक्षक पसंती पुरस्कार हा विभाग यंदा नव्याने समाविष्ट केला आहे.
वाचा: रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टॅनचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल
गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून सहा विभागांची निवड यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये समीक्षकांच्या नजरेतून, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट गीतकार यांना ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ (समीक्षक पसंती) हा पुरस्कार देण्यात येणार आहे. समीक्षकांची पसंती मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार याची कलाकार आणि प्रेक्षकांनाही कमालीची उत्सुकता आहे.
या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांनी ज्या चित्रपट व कलाकारांना पसंतीचा कौल दिलेला असतो त्यांनाच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्काराने गौरवण्यात येते. प्रत्येक कलाकाराला मायबाप रसिकांकडून प्रेम हवं असतं. रसिक प्रेक्षकांकडून मिळणारी दाद त्यांना हवी असते. त्यामुळे वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधील कलाकार, दिग्दर्शक, गायक यांच्यासह विविध विभागांसाठी नामांकने जाहीर केली जातात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीचा कौलच यंदाचा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ त्या नावावर शिक्कामोर्तब करत असतो.
यंदा समीक्षक पंसती स्पर्धेत चित्रपट विभागांमध्ये गोदावरी, आत्मपॅम्फलेट, श्यामची आई, तेंडल्या आणि वाळवी हे चित्रपट आहेत. तर समीक्षक पसंतीच्या नामांकनात दिग्दर्शक विभागासाठी निखिल महाजन, आशिष बेंडे, सुजय डहाके, सचिन जाधव व नचिकेत वाईकर, परेश मोकाशी यांच्या नावांची वर्णी लागली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात जितेंद्र जोशी, ओम भूतकर, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे ही नावं स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातून नामांकनात गौरी नलावडे, गौरी देशपांडे आणि नीना कुलकर्णी यांची नावे आहेत. सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून नामांकन यादीत निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख, परेश मोकाशी, सुनील सुकथनकर, सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर, मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी यंकट्टी आणि नागराज मंजुळे यांचा समावेश आहे. तर सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागात जितेंद्र जोशी, गुरू ठाकूर आणि अजय अतुल यांची नावे स्पर्धेत आहेत.