मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Gautami Patil: भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2023 08:38 AM IST

Gautami Patil: साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Gautami Patil
Gautami Patil (HT)

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नुकताच एका भाजप आमदाराच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले आहे.

साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलचा खास कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये गावाच्या पंचक्रोशीतील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांनी हजेरी लावली होती. शिवेंद्रराजेंनी काही वेळानंतर कार्यक्रमातून निरोप घेतला. मात्र कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली.

गौतमीच्या कार्यक्रमांची दिवसेंदिवस क्रेझ वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये चक्क पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी वडिलांनी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळा ठरला. कारण या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला अश्लिल नृत्य न करण्यास सांगितले होते.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग