Ashneer Grover Comeback on Tv Show: भारतपेचे सह-संस्थापक आणि माजी एमडी अश्नीर ग्रोव्हर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सध्या त्यांना विविध आरोपांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. अश्नीर या आधी ‘शार्क टँक’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये झळकला होता. आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखला जाणारा अश्नीर ग्रोव्हर बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा अश्नीरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
लवकरच अशनीर ग्रोव्हर एमटीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘रोडीज’च्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहे. मेकर्सनी या शोचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हरला लीडरच्या खुर्चीवर बसलेले पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. एम टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोजमध्ये सगळे लीडर ऑडिशन घेताना दिसत आहेत. ऑडिशन दरम्यान रिया चक्रवर्ती आणि प्रिन्स नरुला देखील एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत.
त्याचबरोबर या शोमध्ये गौतम गुलाटी देखील लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो इतर दोन लीडर्ससोबत फाईट करताना दिसणार आहे. याशिवाय सोनू सूद बॉसच्या खुर्चीवर बसलेला दिसणार आहे. आतापर्यंत रणविजय या खुर्चीवर बसायचा. मात्र, यावेळी प्रिन्स वगळता संपूर्ण टीम बदलण्यात आली आहे. पण, या सगळ्यात अश्नीर ग्रोव्हरने सगळ्यांनाच चकित केले आहे. प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर देखील दिसत आहे. प्रोमोच्या एका क्लिपमध्ये, अश्नीर एका स्पर्धकाला म्हणतो की, ‘तू भीकच मागत आहेस ना? भाऊ मलाच घे मग!’
या प्रोमोमध्ये अश्नीरची जुनी स्टाईल दिसून येत आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या शोपूर्वी अश्नीरने शार्क टँकमध्ये काम केले आहे. तिथे अनेकांना त्याच्या रागाचा सामना करावा लागला होता. त्याने अनेकदा पीच करायला आलेल्या लोकांना फटकारले होते. यानंतर, अश्नीरला शार्क टँकच्या नवीन सीझनमधून बाहेर काढण्यात आले होते.