मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Operation London Café: मराठी चित्रपटाला साऊथ स्टाईल तडका; अभिनेता विराट मडकेचा हटके लूक पाहिलात का?

Operation London Café: मराठी चित्रपटाला साऊथ स्टाईल तडका; अभिनेता विराट मडकेचा हटके लूक पाहिलात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 30, 2022 08:54 AM IST

Operation London Café: ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटात अभिनेता विराट मडके एका वेगळ्या रावडी लूकमध्ये दिसणार आहे.

Virat Madake
Virat Madake

Operation London Café: साऊथच्या ॲक्शन चित्रपटांचा सध्या जगभरात बोलबाला आहे. या चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांना देखील भुरळ घातली आहे. मराठीत देखील आता साऊथ स्टाईल ॲक्शन चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. याच धर्तीवर आता एक असाच साऊथ स्टाईल पॅन इंडिया मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ॲक्शनचा तडका दिसणार आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता विराट मडके याचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

निर्माते दिपक पांडुरंग राणे ही या आगामी पॅन इंडिया चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच समोर आले आहे. या चित्रपटात अभिनेता विराट मडके एका वेगळ्या रावडी लूकमध्ये दिसणार आहे. आत्तापर्यंत विराटने साकारलेल्या भूमिकेपेक्षा एकदम विरोधाभास असणारी भूमिका आणि त्याप्रमाणे त्यातला हा त्याचा लूक दिसून येत आहे. ‘केसरी’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या विराटने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्यामध्ये ‘सोयरिक’ आणि आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांचा देखील समावेश आहे.

आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. विराट मडकेचा आज वाढदिवस त्या निमित्त त्याचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित केले. हातात बंदूक आणि डेंजर लूक असं विराटचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं आहे. या भूमिकेबद्दल बोलताना विराट सांगतो, ‘हा चित्रपट माझ्यासाठी चॅलेंजिंग होता. मानसिकदृष्ट्या आणि शारीरकदृष्ट्याही हा चित्रपट करणं आव्हान होतं. या भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास केला. चॅलेंजिंग लोकेशन्स आणि एक्शन सीन्स यामुळे हा चित्रपट करताना मजा आली. प्रेक्षकांना देखील ही भूमिका नक्की आवडेल.’

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट मराठी आणि कन्नड या दोन भाषांमध्ये शूट झाला आहे. सदागरा राघवेंद्र यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या नव्या वर्षात अर्थात २०२३मध्ये ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point