Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. अवघ्या दोन दिवसांत नरेंद्र मोदीच्या तब्बल सहा सभा होणार आहेत. येत्या ३० एप्रिल २०२४ ला नरेंद्र मोदींची धाराशीव येथे सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव-तुळजापूर महामार्ग सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील उमेदवार अर्चना पाटील यांच्या विजयासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये येत्या ३० एप्रिलला सभा घेणार आहेत. धाराशिव-तुळजापुर रस्त्यावरील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर सकाळी ११.०० वाजता ही सभा होणार आहे. यामुळे सभेच्या दिवशी धाराशिव- तुळजापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
मोदींच्या सभेदरम्यान धाराशिव-तुळजापूर हा महामार्ग सर्व वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात धाराशिव-तुळजापूर महामार्ग केवळ पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी खुला असेल.
यंदा धाराशीव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षातील नेते ओमराजे निंबाळाकर आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी ही जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वास निंबाळाकर यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरच कोणी बाजी मारली, हे स्पष्ट होईल.
२९ एप्रिल २०२४: पहिली सभा (सोलापूर) सकाळी ११.०० वाजता.
२९ एप्रिल २०२४: दुसरी सभा (कराड) दुपारी ०१.०० वाजता.
२९ एप्रिल २०२४: तिसरी सभा (पुणे) संध्याकाळी ०६.०० वाजता.
३० एप्रिल २०२४: चौथी सभा (माळशिरस) सकाळी ११.०० वाजता.
३० एप्रिल २०२४: पाचवी सभा (लातूर) दुपारी ०१.०० वाजता.
३० एप्रिल २०२४: सहावी सभा (धाराशिव) संध्याकाळी ०४.०० वाजता.