Sanjay Raut on EVM Fault Conspiracy : महाराष्ट्रातील आठ जागांसह देशभरात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. वर्धा व अमरावती इथं ईव्हीएम बिघाडाचा मतदारांना फटका बसला. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कटकारस्थानाचा आरोप केला आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ईव्हीएम बिघाड वारंवार होतोय की केला जातोय हे पाहायला हवं. वर्धा, अमरावतीमध्ये महाविकास आघाडी जिंकते आहे. वर्ध्यात भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या भीतीपोटी कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना ताटकळायला लावणं, मग मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवणं हा कटकारस्थानाचा भाग असतो, असं राऊत म्हणाले.
'साधारण संध्याकाळच्या वेळी ईव्हीएम मशीन सुरू करायच्या, मग हव्या त्या झुंडी येऊन उभ्या करायच्या, पण सकाळी येणाऱ्या मतदारांना नाउमेद करणं, निराश करणं हे मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील असं वातावरण आहे. ३० ते ३५ हा आमचा आकडा आहे. आज मतदान होत असलेल्या आठही जागा महाविकास आघाडी जिंकत आहे,’ असा दावा संजय राऊत यांनी आज केला.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यावर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. ‘बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवले गेलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, दहशतवादावरती उपायोजना अशी वचनं आम्ही वचननाम्यातून दिली आहेत, त्याला भाजपचा विरोध आहे का?,’ असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी केला. ‘मोदींनी जे गेल्या दहा वर्षात अनेक यू टर्न घेतलेले आहेत, त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा आहे. आम्ही प्रथमच आमचा वचननामा तीन पक्ष एकत्र आल्यावर जाहीर केला. त्याची पोटदुखी यांना आहे,’ असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.
संबंधित बातम्या