मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Explainer : सोलापूर आणि माढा मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव किती? जाणून घ्या जातीची समीकरणे

Loksabha Explainer : सोलापूर आणि माढा मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव किती? जाणून घ्या जातीची समीकरणे

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 16, 2024 05:03 PM IST

सोलापूर जिल्ह्यातील माळशिराज तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी बंडाचे निशाण फडकवताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास विमान पाठवून जानकरांना नागपूरला चर्चेसाठी बोलवून घेतलं. माढा, सोलापूर पटट्यात धनगर समाजाची मतं किती प्रभावशाली ठरतात?

उत्तम जानकर, धनगर समाजाचे नेते
उत्तम जानकर, धनगर समाजाचे नेते

सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (२००९-२०१४) यांनी केलं होतं. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील येथून विजयी झाले होते. तर २०१९ साली भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मजबूत पकड लक्षात घेता २०२४च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात माढा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार गटाकडे गेला.

ट्रेंडिंग न्यूज

माढ्यात धनगर समाजाची मते ठरतात निर्णायक

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेचे चार मतदारसंघ करमाळा (संजय मामा शिंदे - अपक्ष), माढा (बबनराव शिंदे, राष्ट्रवादी -अजित पवार गट), सांगोला (शहाजीबापू पाटील, शिवसेना-शिंदे गट) माळशिरस (राम सातपुते- भाजप) आणि सातारा जिल्ह्यातील विधानसभेचे दोन मतदारसंघ फलटण (दीपक चव्हाण, राष्ट्रवादी -अजित पवार गट) आणि माण (जयकुमार गोरे, भाजप) असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले सहकार क्षेत्रात मातब्बर समजले जाणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा अकलूज हा गढ माढा लोकसभेअंतर्गत येतो. परंतु धनगर फॅक्टर हा माढा मतदारसंघात निर्णायक समजला जातो. माढा आणि शेजारच्या सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी व्होट बँक आहे. हा आकडा १० लाख असल्याचा एक अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर उभ्या असलेल्या उमेदवारांना धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. शेजारच्या बारामती या लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी सुरूवातीला भाजपच्या विद्यमान खासदाराला मात देण्यासाठी धनगर नेते महादेव जानकर यांना तिकीट देऊ केले होते. परंतु एका रात्रीत समीकरण पालटले आणि भाजपने महादेव जानकरांना परभणीतून तिकीट जाहीर केले. दरम्यान, माढ्याचे विद्यमान भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात सुप्त राजकीय वैर असल्याचे गेले पाच वर्ष दोघांमध्ये संघर्ष सुरू होताच. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देऊ नये यासाठी मोहिते-पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. नेमका याचाच फायदा घेत शरद पवार यांनी मोहिते पाटील यांचे पुतणे, भाजपचे सोलापूरचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते यांना आपल्याकडे वळवून माढ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट जाहीर केले आहे. आता मोहिते कुटुंबाने जिल्ह्यात भाजपची साथ सोडल्यामुळे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सीट धोक्यात आल्याचे लक्षात येताच भाजप नेतृत्वाने मतदारसंघातील जातीची समिकरणे आपल्या बाजुने वळवायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

माढ्यात उत्तम जानकरांचा भाजपला कितपत फायदा होणार?

मूळचे माळशिरस तालुक्यातील धानोरेगावचे रहिवासी असलेले उत्तम जानकर हे या भागातले प्रभावी धनगर नेते मानले जातात. उत्तम जानकर यांनी त्यांच्या गावातूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली. माळशिरस पंचायत समिती सदस्य, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत असताना शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी झालेल्या विविध शेतकरी आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी माळशिरस (एससी) मतदारसंघातून भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत डोळस यांना ८२,३६० तर, उत्तम जानकर यांना ६६, १३४ मते मिळाली होती. २०१९ साली जानकर यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पुन्हा माळशिरसमधून विधानसभा लढवली होती. यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते यांना एक लाख तीन हजार ५०७ तर जानकर यांना एक लाख ९१७ मते मिळाली होती. दरम्यान, जानकर हे यंदा सोलापूरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना डावलून राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याने जानकर नाराज होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली.

फडणवीसांनी का पाठवले ‘विशेष विमान’?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या निवडणूक प्रचारासाठी नागपुरात तळ ठोकून आहेत. उत्तम जानकरांची नाराजी मिटवण्यासाठी फडणवीस यांनी जाणकर यांना चर्चेसाठी नुकतेच नागपूरला बोलवून घेतले होते. जानकर यांना सोलापूरहून नागपूरला आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपूरहून चार्टर विमान पाठवले होते. या बैठकीत जानकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आल्याचे कळते. बदललेल्या राजकीय परिस्थिती भाजप आणि जानकर या दोन्ही पक्षांना आता एकमेकांची गरज असून, ही युती दोन्ही पक्षांसाठी फायद्याची ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या