मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs GT Highlights : २२४ धावा करूनही दिल्लीचा केवळ ४ धावांनी विजय, शेवटच्या चेंडूवर गुजरातचा पराभव

DC vs GT Highlights : २२४ धावा करूनही दिल्लीचा केवळ ४ धावांनी विजय, शेवटच्या चेंडूवर गुजरातचा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 24, 2024 11:19 PM IST

dc vs gt ipl 2024 highlights : आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली आणि गुजरात आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीने ४ धावांनी विजय मिळवला.

DC vs GT Indian Premier League 2024
DC vs GT Indian Premier League 2024 (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ४० व्या सामन्यात आज (२४ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ४ धावांनी पराभव केला. गुजरातला शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती, राशीद खानने या धावा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी ४ धावा कमी पडल्या. 

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावा करायच्या होत्या. मुकेश कुमार गोलंदाजीला होता, तर फलंदाजीला राशीद खान होता. राशीदने पहिल्या २ चेंडूत २ चौकार मारले.

यानंतर गुजरातला शेवटच्या दोन चेंडूंवर ११ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर राशीदने षटकार खेचला. पण शेवटचा चेंडू मुकेश कुमारने लो फुलटॉस टाकला, यावर राशीदला केवळ एकच धाव करता आली.

याआधी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने प्रथम फलंदीज करताना २० षटकात २२४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ २० षटकात ८ बाद २२० धावाच करू शकला.

गुजरातकडून डेव्हिड मिलरने २३ चेंडूत ५५ धावा केल्या तर राशिद खानने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. साई सुदर्शनने ३९ चेंडूत ६५ धावा केल्या.

दरम्यान, आता या विजयासह दिल्ली संघ ८ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी ९ पैकी ५ सामने गमावले असून त्यांचे ८ गुण आहेत. मात्र, नेट रन रेटमध्ये गुजरातचा संघ दिल्लीच्या मागे आहे. 

दिल्लीचा पुढील सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध २७ एप्रिल रोजी दिल्लीत होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २८ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आपला पुढील सामना खेळणार आहे.

दिल्लीचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ४ गडी गमावून २२४ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. पंतने ४३ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ५ चौकार मारले. तर अक्षरने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या.

दिल्लीने शेवटच्या ५ षटकात ९७ धावा केल्या आणि एक विकेट गमावली. २०व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोहित शर्माच्या षटकात पंतने ३१ धावा केल्या. या षटकात त्याने ४ षटकार मारले आणि एक चौकारही मारला.

एकवेळ दिल्लीने ४४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अक्षर पटेल आणि पंत यांच्यात ११३ धावांची भागीदारी झाली. अक्षर ६६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी पंत आणि ट्रिस्टन स्टब्समध्ये १८ चेंडूत ६७ धावांची अखंड भागीदारी झाली. यामुळे दिल्लीने मोठी धावसंख्या उभारली.

IPL_Entry_Point