मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani on Hindenburg Report : धक्का बसल्याची कबुली देत अदानी समूहानं गुंतवणूकदारांसमोर मांडली बाजू

Adani on Hindenburg Report : धक्का बसल्याची कबुली देत अदानी समूहानं गुंतवणूकदारांसमोर मांडली बाजू

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 30, 2023 03:11 PM IST

Adani on Hindenburg Report : हिंडनबर्गच्या अहवालामुळं आम्हालाही धक्का बसला आहे, अशी कबुली अदानी समूहानं दिली आहे.

Gautam Adani
Gautam Adani (REUTERS)

Adani appeal to Investors and shareholders : 'हिंडनबर्ग' रिसर्च संस्थेच्या अहवालामुळं उद्योग जगतात खळबळ उडाली असून भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहानं एक पत्रक प्रसिद्धीस देत संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. 'हिंडनबर्ग'चा अहवाल चुकीचा, निराधार आणि कुहेतूनं प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामुळं आम्हाला धक्का बसला आहे. 'शॉर्ट सेलर' असलेल्या हिंडनबर्गनं स्वत:च्या फायद्यासाठी हा उद्योग केला आहे, असा आरोप अदानी समूहानं केला आहे. 'आमच्या भागधारकांचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' अशी ग्वाही देखील दिली आहे.

'अदानी एन्टरप्रायझेसनं देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ आणला असतानाच असा अहवाल येणं यातूनच हिंडनबर्गचा हेतू स्पष्ट झाला आहे. अहवालात केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्याची खरंतर आम्हाला गरज नाही. मात्र, पारदर्शकता व भागधारकांच्या हिताशी बांधिलकी म्हणून आम्ही उत्तर देत आहोत, असं स्पष्ट करत अदानी समूहानं हिंडनबर्गचा अहवाल खोडून काढणारे काही मुद्दे मांडले आहेत.

  •  हिंडनबर्गनं हा अहवाल कुठल्याही परोपकारी किंवा चांगल्या हेतूनं प्रकाशित केलेला नाही. उलट सिक्युरिटीज व परकीय चलन कायद्यांचं उल्लंघनच याद्वारे केलं आहे. हिंडनबर्ग हा एक अनैतिक व अल्पकालीन विक्रेता आहे, हे वास्तव आहे. रोखे बाजारात शेअरच्या किंमतीतील घसरणीचा अल्प कालावधीतील विक्रेत्याला लाभ होतो. हिंडेनबर्गनं 'शॉर्ट पोझिशन' घेऊन शेअरच्या किंमती खाली आणण्यासाठी हा दस्तावेज प्रकाशित केला.
  •  दोन वर्षांच्या अभ्यासानंतर हा अहवाल प्रसिद्ध केल्याचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात अहवालातील बरीच माहिती गेल्या अनेक दशकांपासून सार्वजनिक आहे. भारतीय कायद्याची किंवा येथील उद्योग पद्धतीची कोणतीही समज 'हिंडनबर्ग'ला नाही.
  • पारदर्शकता आणि खुलेपणाचा आव आणणाऱ्या या संस्थेचे कर्मचारी किंवा गुंतवणूकदार यांच्याबद्दल कोणालाच फारसे काही माहीत नाही. अनेक दशकांच्या अनुभवाचा दावा करणारी ही संस्था २०१७ मध्ये स्थापन झाली आहे. हिंडनबर्गनं त्यांची अल्पकालीन गुंतवणूक, निधीचा स्रोत, गुंतवणूकदार याची कुठलीही माहिती जाहीर केलेली नाही.

गौतम अदानींनी दोन दिवसात गमावली इतकी संपत्ती; एवढ्या पैशांत पाकिस्तानने ८ महिने बसून खाल्ले असते!

  • अहवालात उपस्थित केलेल्या ८८ प्रश्नांपैकी एकही प्रश्न हा शोधपत्रकारितेवर आधारलेला नाही. आधीच सार्वजनिक असलेल्या तपशीलांचे निवडक संकलन आहे. सनसनाटी पसवरण्यासाठी ते नव्यानं प्रकाशित करण्यात आलं आहे. हिंडनबर्गच्या ८८ मुद्द्यांपैकी ६५ बाबी अदानी समूहाच्या संकेतस्थळावर आधीपासूनच आहेत. उर्वरित २३ प्रश्नांपैकी १८ प्रश्न हे भागधारक आणि तृतीय पक्षांशी संबंधित आहेत, तर अन्य ५ प्रश्न हे काल्पनिक तथ्यावर आधारलेले आहेत.
  • अदानी समूह देशातील सर्व कायदे आणि नियमांचं पालन करतो. आमच्या सर्व भागधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अदानी समूहात अंतर्गत नियंत्रण आणि लेखा परीक्षणाची सक्षम यंत्रणा आहे. भागधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील.

WhatsApp channel