मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group: अदानींचे ग्रह फिरले! धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काढून घेण्याची मागणी

Adani Group: अदानींचे ग्रह फिरले! धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काढून घेण्याची मागणी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 30, 2023 02:18 PM IST

Nana Patole on Adani group and Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काढून टाकण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काढून घेण्याची मागणी होत आहे
अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काढून घेण्याची मागणी होत आहे

मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुबईच्या कंपनीने जास्त पैशांची बोली लावून करार केला असतानाही तो करार रद्द करुन मोदी सरकारच्या हट्टापायी धारावीचा प्रकल्प अदानी कंपनीला कमी पैशात देण्यात आला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अदानी कंपनीचा गैरकारभार पाहता धारावीतील लाखो गरीब लोकांची घरे व छोट्या उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदार सल्लागार कंपनी असलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी कंपनीचा गैरकारभार आता उघड झाला असून सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

अदानीमुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे पैसे धोक्यात

नाना पटोले म्हणाले, ‘केंद्रात सत्तेवर येण्याआधीपासून उद्योपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचे संबंध जगजाहीर आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर या संबंधामुळे मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांवर विशेष मर्जी दाखवत स्टेट बँक इंडियाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. देशातील सर्वात मोठी व सामान्य गुंतवणुकदारांची विमा कंपनी LIC मधील ७४ हजार कोटी रुपये अदानीच्या कंपनीत गुंतवले. अदानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहचले ते केवळ मोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच. फायद्याच्या सरकारी कंपन्याही मोदी सरकारने अदानीच्या घशातच घातल्या आहेत. अदानी कंपनीत मोठे गौडबंगाल आहे हे उघड होताच या कंपन्यातील शेअर कोसळले व एसबीआय, एलआयसी सह सरकारी कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. अदानीचा फुगा आज फुटला आहे. सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयचा सुद्धा असाच बोलबाला होता पण सहाराचा फुगा फुटला आणि सुब्रत रॉयला जेलची हवा खावी लागली. करोडो लोकांचे पैसेही बुडाले. अदानीची अवस्थाही सहाराच्या सुब्रत रॉय सारखीच होईल’ असं नाना पटोले म्हणाले.

मुंबई विमानतळ अदानींना देण्यासाठी मोदी सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर

नाना पटोले पुढे म्हणाले की मुंबई विमानतळ अदानी कंपनीला देण्यासाठी मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा कसा गैरवापर केला हे सर्वांना माहित आहे. मुंबईतील वीज वितरणही अदानीला देण्याचा घाट राज्यातील फडणवीस सरकारने घेतला होता पण महावितरणचे कर्मचारी व जनतेच्या विरोधामुळे तूर्तास वीज वितरण अदानीकडे जाऊ शकले नाही, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या