Wrestling Trials for Paris Olympic 2024 : या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी सुरू आहे. पण या निवड चाचणीदरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सोमवारी (११ मार्च) पटियाला येथे चांगलाच गोंधळ घातला. विनेशला दोन वजनी गटात खेळायचे होते.
बराच गदारोळ झाल्यानंतर विनेशला दोन सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. तिने ट्रायल्समध्ये महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटात भाग घेतला. मात्र यादरम्यान तिने ५० किलो वजनी गटात बाजी मारली. तर ५३ किलो वजनी गटात विनेशला पराभवाचा सामना करावा लागला.
५३ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत विनेशचा ०-१० अशा फरकाने पराभव झाला. मात्र ५० किलो वजनी गटात विजय मिळवल्यानंतर विनेशला आता आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. तिने ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शिवानीचा पराभव केला आहे.
या दोन सामन्यांच्या आधी बराच वेळ गोंधळ झाला. विनेशला दोन्ही गटात स्पर्धा करायची होती. तसेच, ५३ किलो वजनी गटाचे ट्रायल्स हे ऑलिम्पिकच्या काही दिवसआधी व्हावेत, अशी विनेशची इच्छा होती. पण हे होऊ शकले नाही.
ही मागणी नाकारल्यानंतर विनेश फोगटने गोंधळ घातला. ऑलिम्पिकच्या काही दिवस आधी ५३ किलो वजनी गटाचे ट्रायल्स घेतले जावे, असे लेखी आश्वासन तिने अधिकाऱ्यांकडून मागितले होते. यामुळे विनेशने महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील ट्रायल्स होऊ दिल्या नाहीत. या विलंबामुळे बाकीचे पैलवान नाराज झालेले दिसले.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अॅडहॉक पॅनेलद्वारे या निवड चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी, क्रीडा मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आलेले WFI त्याचे आयोजन करत होते. यानंतर आता IOA ने स्थापन केलेल्या अॅडहॉक समितीने आधीच स्पष्ट केले आहे की ५३ किलो वजनी गटासाठी ही शेवटची ट्रायल असेल.