मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Accident: धक्कादायक! ऋषभचे पैसे चोरले, नंतर चोरट्यांनीच दिली अपघाताची माहिती

Rishabh Pant Accident: धक्कादायक! ऋषभचे पैसे चोरले, नंतर चोरट्यांनीच दिली अपघाताची माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2022 02:34 PM IST

Rishabh Pant Accident money looted during accident: ऋषभ पंतच्या अपघातानंतर आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ऋषभच्या अपघातानंतर त्याच्या जवळील पैशांवर काही युवकांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident

Rishabh Pant Car Accident update: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जानेवारीत होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पुढील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पंतची निवड झाली नाही. यानंतर पंत दिल्लीहून आपल्या गावी रुरकीला जात होता. यादरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला. या मोठ्या घटनेने क्रिकेट जगतही हादरून गेले आहे. यानंतर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

मात्र, आता ऋषभच्या अपघातानंतर आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ऋषभच्या अपघातानंतर त्याच्या जवळील पैशांवर काही युवकांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी ऋषभ पंतची मर्सिडीज कार आज (३० डिसेंबर) पहाटे ५.१५ वाजता नारसन बॉर्डरवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने वाटसरूंनी विंडो स्क्रीन तोडून पंतला गाडीतून बाहेर काढले. कारमध्ये त्यावेळी तो एकटाच होता.

मात्र, त्यापूर्वी अपघात घडल्यानंतर ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तिथे काही युवक पोहोचले. त्या युवकांनी ऋषभला कारमधून बाहेर पडण्यास मदत करण्याऐवजी त्याच्या बॅगेतील पैशांवर डल्ला मारला आणि तिथून धुम ठोकली. विशेष म्हणजे, या युवकांनीच नंतर पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. त्यामुळेच अॅम्बुलन्स वेळेवर घटनास्थळी पोहोचली आणि ऋषभ पंत वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

BCCI ने दिली ऋषभच्या प्रकृतीबाबत माहिती

अपघात झाल्यानंतर ऋषभला स्थानिकांनी रुरकी येथील रुग्णालयात दाखल केले होते. बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे. बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

बोर्डाने म्हटले आहे की, "ऋषभच्या कपाळावर दोन कट आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यातील लिगामेंट फाटले आहेत आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे." त्याच्या पाठीवर खरचटल्याच्या जखमा आहेत. ऋषभची प्रकृती स्थिर असून तो आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाईल".

WhatsApp channel