मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफीत विचित्र प्रकार, पीच खराब असल्याचे सांगत सामना अर्ध्यातच थांबवला

Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफीत विचित्र प्रकार, पीच खराब असल्याचे सांगत सामना अर्ध्यातच थांबवला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 21, 2022 08:53 PM IST

Punjab vs Railway match stopped due to pitch, Ranji Trophy 2022रणजी ट्रॉफीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील कर्नेल सिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवरून हा वाद निर्माण झाला आहे. या खेळपट्टीवर दोन दिवसांत दोन्ही संघ ऑलआऊट झाले. तिसरा डाव सुरू झाल्यानंतर पंजाबच्या संघाने पीच खराब असल्याचे सांगून सामना खेळण्यास नकार दिला.

Punjab vs Railways Ranji Trophy
Punjab vs Railways Ranji Trophy

रणजी ट्रॉफीतील एका सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्ध्या सामन्यातूनच दोन्ही संघांंनी सामना खेळण्यास नकार दिला आहे. या संघांनी खराब खेळपट्टीमुळे सामना खेळण्यास नकार दिला आहे. ही घटना दिल्लीत घडली आहे. येथील कर्नेल सिंग स्टेडियमवर ग्रुप D मधील रेल्वे आणि पंजाब यांच्यात सामना सुरू होता. सामन्याच्या पहिल्या २ दिवसांतच दोन्ही संघ गारद झाले. आधी पंजाबचा संघ १६२ धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर रेल्वे संघही १५० धावांत गारद झाला.

यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२१ डिसेंबर) पंजाबचा संघ आपला दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हा त्यांचे अवघ्या १८ धावांत ४ महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लंचची वेळ आली तेव्हा पंजाबच्या संघाने सामना खेळण्यास नकार दिला. ही खेळपट्टी खेळण्यायोग्य नाही. ही धोकादायक खेळपट्टी आहे. यावर सामना खेळवला जावू शकत नाही, असे कारण संघांनी दिले. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाच मदत मिळत होती. फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले.

त्यानंतर पंचांनी या प्रकरणी दोन्ही संघांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर पंचांनी या दिवशीची खेळ रद्द केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ गुरुवारी सुरू होईल. पण त्यासाठी खेळपट्टी एकदम नवीन आणि ताजी असेल. म्हणजेच आता सामना नव्या खेळपट्टीवर सुरू होईल, असे पंचांनी स्पष्ट केले आहे.

न्युट्रल पीच क्युरेटरने तयार केली पीच

अनेक आक्षेपांनंतर रणजी ट्रॉफीच्या या सामन्याची विकेट तटस्थ पीच क्युरेटरने तयार केली होती. दिल्लीतील या कर्नेल सिंग स्टेडियमची खेळपट्टी रांचीच्या क्युरेटरने तयार केली होती. आता पंजाब संघाने या खेळपट्टीवर खेळण्यास नकार दिल्याने पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ नव्या खेळपट्टीवर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या सामन्यात रेल्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी पंजाब संघाला १६२ धावांत गुंडाळले. यादरम्यान वेगवान गोलंदाज आदर्श सिंगने ५ बळी घेतले. यानंतर रेल्वेचा संपूर्ण संघ १५० धावांत गारद झाला. पंजाबकडून वेगवान गोलंदाज बलजीत सिंगने ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या. दुसऱ्या डावात पंजाबने १८ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. रेल्वेचा वेगवान गोलंदाज युवराज सिंगने ४ विकेट घेतले. दुसऱ्या दिवशी खेळ थांबेपर्यंत कर्णधार मनदीप सिंग २ आणि अनमोलप्रीत सिंग शुन्यावर नाबाद आहेत.

यापूर्वी २००९ मध्येही दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावरील भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे सामना धोकादायक खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता.

WhatsApp channel