मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDW vs ENGW: झूलन गोस्वामीला विजयी निरोप; टीम इंडियाने मालिका ३-० ने जिंकली

INDW vs ENGW: झूलन गोस्वामीला विजयी निरोप; टीम इंडियाने मालिका ३-० ने जिंकली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 24, 2022 11:22 PM IST

INDW vs ENGW: भारताची दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामी हिला अविस्मरणीय अशा मालिका विजयाची भेट देण्यात आली. झूलन गोस्वामीचा हा अखेरचा सामना होता.

झूलन गोस्वामी
झूलन गोस्वामी (फोटो - रॉयटर्स)

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असं लोळवलं. यासह भारताची दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामी हिला अविस्मरणीय अशा मालिका विजयाची भेट देण्यात आली. झूलन गोस्वामीचा हा अखेरचा सामना होता. याआधीच तिने निवृत्तीची घोषणा केली होती. झूलन जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरली तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी तिला गार्ड ऑफ ऑनरही दिला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला १६ धावांनी पराभूत केलं. तब्बल २३ वर्षांनी इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची किमया टीम इंडियाने केली. याआधी १९९९ मध्ये भारताने अशी कमाल केली होती. भारताकडून अखेरच्या सामन्यात रेणुका सिंहने ४ विकेट घेतल्या तर अखेरचा सामना खेळणाऱ्या झूलनने २ तर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. इंग्लंडच्या संघाला ४३.४ षटकात १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारताने दिलेल्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट गेल्यानं एकवेळ ५३ धावांवर ६ गडी बाद अशी अवस्था होती. इंग्लंडच्या तब्बल ६ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. फक्त चारच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

तत्पूर्वी, भारतीय महिला संघाला १६९ धावाच करता आल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा डाव ४५.४ षटकात गुंडाळला. अष्टपैलू दीप्ति शर्माने भारताकडून १०६ चेंडूत ६८ धावा केल्या. तर सलामीची फलंदाज स्मृती मंधाना हिने ७९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. या दोघींशिवाय फक्त पूजा वस्त्रकार हिला दुहेरी आकडा गाठता आला.

WhatsApp channel

विभाग