मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs BAN: पंत-शमी आऊट, टॉप ऑर्डर फेल... 'या' ५ कारणांमुळं भारतानं मालिका गमावली

IND vs BAN: पंत-शमी आऊट, टॉप ऑर्डर फेल... 'या' ५ कारणांमुळं भारतानं मालिका गमावली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 08, 2022 10:47 AM IST

india vs bangladesh odi series analysis: बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाने सलग दुसरी वनडे मालिका गमावली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका गमावली होती.

IND vs BAN
IND vs BAN

बांगलादेशने भारताविरूद्ध ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. यामध्ये भारताला ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही एकदिवसीय सामन्यातील पराभवामागे एक नाही तर ५ प्रमुख कारणे आहेत. पहिल्या वनडेत भारताचा एका धावेने पराभव झाला होता. 

पंत आणि शमी वेळेवर संघाबाहेर झाले

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आला तेव्हा पूर्ण तयारीनिशी आला नव्हता. कारण पहिला सामना सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने तो संघाबाहेर झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे पंतच्या जागी बदली खेळाडूही घेण्यात आला नाही.

या सोबतच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी उमरान मलिकचा समावेश करण्यात आला. अशा स्थितीत टीम इंडिया पूर्णपणे तयार नव्हती हे स्पष्ट होते.

टॉप ऑर्डर प्लॉप

दुसरे कारण म्हणजे भारताची टॉपऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवनसारखे फलंदाज पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरले. दुखापतग्रस्त रोहितच्या जागी कोहली दुसऱ्या सामन्यात सलामीला आला. मात्र, काही फरक पडला नाही. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १३ धावांत २ गडी गमावले. रोहित शर्मा ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने अर्धशतक केले, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

मिडल ऑर्डरमध्ये भागीदारी झाली नाही

मधल्या फळीतही भारताला दोन्ही सामन्यात मोठी भागीदारी करता आली नाही. पहिल्या सामन्यात केएल राहुलने मधल्या फळीत ७३ धावा करून संघाला सांभाळले, परंतु इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. तर दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने ८२ आणि अक्षर पटेलने ५६ धावा केल्या. पण त्यांच्याशिवाय केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर फ्लॉप ठरले.

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाज फ्लॉप

या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजीचेही मोठे टेन्शन राहिले आहे. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण मधल्या षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये खराब कामगिरी केली. पहिल्या सामन्यात बांगलादेशने १३६ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र अखेरच्या विकेटसाठी मेहदी हसन आणि मुस्तफिझूर रहमानने नाबाद ५१ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांना शेवटची विकेट घेता आली नाही.

दुसऱ्या सामन्यातही असेच काहीसे घडले, भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून बांगलादेशच्या ६ फलंदाजांना अवघ्या ६९ धावांत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र येथून पुन्हा मेहदी हसनने महमुदुल्लाहसोबत १४८ धावांची भागीदारी करत संघाला २७१ धावांपर्यंत नेले. मेहदीने नाबाद १०० धावा केल्या. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना अखेरच्या षटकांमध्ये विकेट्स काढता आल्या नाहीत.

खराब फिल्डिंग

या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. विशेषत: पहिल्याच सामन्यात १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे १३६ धावांवर ९ गडी बाद झाले होते. त्यानंतर भारतीय संघ विकेटच्या शोधात होता. त्यावेळी केएल राहुलने मेहदी हसनचा सोपा झेल सोडला होता. तर वॉशिंग्टन सुंदरने झेल घेण्याचा अजिबात प्रयत्नच केला नाही.

WhatsApp channel