मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kedar Jadhav: बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील आठ तासानंतर सापडले!

Kedar Jadhav: बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील आठ तासानंतर सापडले!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 28, 2023 11:36 AM IST

Kedar Jadhav’s father found: पुणे पोलिसांनी आठ तासांची शोध मोहिम राबवून केदार जाधवच्या वडिलांना अखेर शोधून काढले.

Kedar Jadhavs father found
Kedar Jadhavs father found

Alankar Police Station: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केदार जाधवचे वडील महादेव जाधव (वय ८५) सोमवारी (२७ मार्च २०२३) सकाळी कोथरूड परिसरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी केदार जाधवने पुणे शहरातील अलंकार पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी केदार जाधव यांच्या वडीलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार केदार जाधवच्या वडिलांना शोधण्यात अलंकार पोलिसांना यश आले आहे. तब्बल आठ तास शोध मोहिम राबवून पोलिसांनी महादेव जाधव यांना शोधून काढले.

जाधव कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव कोथरूड भागातून सोमवारी (२७ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले. मात्र, सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारचे वडील महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे जाधव कुटुंबीय त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. मात्र, आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. त्यांनी काही वेळ तिथे चकरा मारल्या. मात्र, त्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघून गेले.

WhatsApp channel

विभाग