भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. हे दोन्ही कुस्तीपटू नॅशनल टीम सिलेक्शन ट्रायल्स म्हणजेच, राष्ट्रीय संघ निवड चाचणीत पराभूत झाले.
बजरंग पुनिया अलीकडेच भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात निषेध केल्यामुळे चर्चेत आला होता.
पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो गटाच्या उपांत्य फेरीत पुनियाला रोहित कुमारने पराभूत केले. रोहितने हा सामना १-९ असा जिंकला. बजरंगने यापूर्वी रविंदरविरुद्ध सामना खेळला होता. यात तो कसाबस विजयी झाला होता.
रिपोर्ट्सनुसार, सेमीफायनलमधील पराभवानंतर बजरंग पुनिया चांगलाच संतापलेला दिसला. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) च्या अधिकाऱ्यांनी पुनियाकडून डोपचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला पण तो तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या सामन्यासाठीही थांबला नाही आणि निघून गेला. बजरंगने ट्रायलसाठी रशियात प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहियालाही ट्रायल्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. दहियाने दुखापतीनंतर नुकतेच पुनरागमन केले आहे. अमनने त्याचा १३-१४ असा पराभव केला. अमनने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्याने कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा ९-२ असा पराभव झाला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बजरंगचे हे सलग दुसरे सुवर्णपदक होते.
बजरंगाला पराभूत करणारा रोहित अंतिम फेरीत सुजित कलकलविरुद्ध पराभूत झाला. अशाप्रकारे सुजीतने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. आता तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी ६५ किलो गटात कोटा मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर रोहित आता आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल.
भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकसाठी फक्त अंतिम पंघल (महिला ५३ किलो) द्वारे कोटा मिळवला आहे. तर ट्रायल्समध्ये जिंकलेल्या कुस्तीपटूंच्या यादीवर नजर टाकली तर जयदीप (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), दीपक नेहरा (९७ किलो) आणि सुमित मलिक (१२५ किलो) यांचा समावेश आहे.
आशियाई पात्रता फेरीसाठीच्या भारतीय संघात अमन सेहरावत (५७ किलो), सुजित कलकल (६५ किलो), जयदीप (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), दीपक नेहरा (९७ किलो) आणि सुमित मलिक (१२५ किलो) यांचा समावेश आहे.