मराठी बातम्या  /  धर्म  /  Shastra : कपाळाच्या मध्यभागीच टिळा का लावला जातो?

Shastra : कपाळाच्या मध्यभागीच टिळा का लावला जातो?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 01, 2023 09:01 AM IST

Tilak On Forehead : कपाळी टिळा लावण्यामागे अंधश्रद्धा आहे की कपाळी टिळा लावण्यामागे काही शास्त्र आहे असाही प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

कपाळाच्या मध्यभागीच का लावतात टिळा
कपाळाच्या मध्यभागीच का लावतात टिळा (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्मात कपाळी टिळा असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी आपण सर्वच कपाळावर चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावतो. कपाळी टिळा असणं हे कशाचं प्रतीक आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कपाळी टिळा लावण्यामागे अंधश्रद्धा आहे की कपाळी टिळा लावण्यामागे काही शास्त्र आहे असाही प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको. अगदी आपल्या आरतीतही कपाळी केशरी गंध असा उल्लेख आल्याचं नजरेस पडलं असेल. आता कपाळी टिळा लावण्यामागे काय शास्त्र आहे याची आपण माहिती घेऊया.  

कोणत्या प्रकारचा टिळा, का लावला जातो?

अनेकदा आपण टिळ्याचे वेगवेगळे रंग असल्याचं पाहातो. कोणी लाल रंगाचा टिळा लावतं तर कोणी पांढऱ्या रंगाचा. काही पिवळ्या रंगाचा टिळा लावतात तर काही चक्क काळ्या रंगाचा टिळा लावतात. रंग कोणताही असला तरीही त्याचा परिणाम चांगलाच असतो. लाल रंगाचा टिळा उर्जावान मानला गेला आहे. पिवळ्या रंगाचा टिळा तुम्हाला प्रसन्न ठेवतो. पांढऱ्या रंगाचा म्हणजेच चंदनाचा टिळा भाळी असणं शीतलतेचं, शांती प्रदान करण्यासाठी लावला जातो, तर काळ्या रंगाचा टिळा जो मुख्यत्वे शिवशंकराच्या भक्तांच्या कपाळी पाहायला मिळतो. हा काळ्या रंगाचा टिळा मोहमायेपासून दूर राहाण्याचे संकेत आहेत.

टिळा नेहमी अनामिकेनेच का लावावा?

टिळा नेहमी अनामिकेने लावतात. अनामिका हे सूर्याचे प्रतीक आहे. अनामिकेने टिळा लावल्याने कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते. मान- सन्मान प्राप्ती साठी टिळा अंगठ्याने लावला जातो. तर एखाद्या गोष्टीत विजय मिळवायचा असल्यास तर्जनीने टिळा लावला जातो.

कपाळाच्या मध्यात टिळ्याचं शास्त्रीय महत्व काय?

डोक्याच्या मध्यभागी टिळा नेहमी लावला जातो. डोक्याच्या मध्यभागी टिळक लावण्याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात ७ लहान ऊर्जा केंद्रे आहेत. आपल्या मेंदूच्या मध्यभागी आज्ञाचक्र असल्यामुळे टिळा डोक्याच्या मध्यभागी लावला जातो. ज्याला गुरुचक्र असेही म्हणतात. हे स्थान मानवी शरीराचे केंद्र आहे. हे एकाग्रता आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे. गुरुचक्र हा गुरु ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो. बृहस्पति हा सर्व देवांचा गुरू आहे. म्हणूनच त्याला गुरुचक्र म्हणतात

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग