मराठी बातम्या  /  धर्म  /  Hanuman jayanti 2024 : या शुभ योगात हनुमान जयंती साजरी होणार, जाणून घ्या खास महत्त्व

Hanuman jayanti 2024 : या शुभ योगात हनुमान जयंती साजरी होणार, जाणून घ्या खास महत्त्व

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 17, 2024 04:52 PM IST

Hanuman Jayanti 2024 Date : हनुमान जन्मोत्सव कधी साजरा होणार, कोणत्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला मिळेल शुभ फळ, यादिवशी कोणकोणते शुभ योग घडणार आहेत, हनुमान जयंतीचे महत्व जाणून घ्या.

हनुमान जयंती २०२४ तारीख
हनुमान जयंती २०२४ तारीख

हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रीरामनवमी आणि नवरात्रोत्सवासोबतच या महिन्यात हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या पौर्णिमेला झाला आहे.

काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान जन्माच्या निमित्ताने पूजा केल्याने सर्व रोग दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी पौराणिक समजूत आहे.

हनुमान जयंती तारीख: 

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी २३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल आणि २४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत, २३ एप्रिल २०२४ रोजी उदया तिथीनुसार हनुमान जयंती साजरी केली जाईल.

हनुमान जयंती पूजेची शुभ वेळ/मुहूर्त: 

हनुमान जन्मोत्सवातील पूजेची शुभ वेळ सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते १० वाजून ४१ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी, अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत असेल.

हनुमान जयंती शुभ योग

मंगळवार हा हनुमानाला समर्पित असून, या दिवशी त्यांची जयंती साजरी होत असल्यामुळे यादिवसाचे महत्त्व वाढले आहे. यासोबतच या दिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. यासोबतच मीन राशीतील ग्रहांच्या संयोगामुळे पंचग्रही योग तयार होत आहे. तसेच, मेष राशीत बुधादित्य राजयोग तयार होत आहे. कुंभ राशीत शनी शश राजयोग तयार होत आहे.

हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व : 

हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. याशिवाय हनुमानाला बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे सांगण्यात येते.

पारंपरिक धर्मात हनुमान जन्मोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी योग्य पूजन केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. व्यक्तीच्या कुंडलीतून ग्रह दोष दूर होतात. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून श्री हनुमानाची पूजा करावी.

WhatsApp channel

विभाग