
सध्या बुमराहकडे पर्पल कॅप - मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी (१८ एप्रिल) मुल्लानपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४ षटकात २१ धावा देत ३ बळी घेतले. यासह त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकून पर्पल कॅप मिळवली आहे. बुमराहच्या नावावर आता ७ सामन्यात १३ विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने यंदा एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
चहलच्या नावावर १२ विकेट- आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला युझवेंद्र चहल आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चहलने आतापर्यंत ७ सामने खेळले असून या त्याने १२ बळी घेतले आहेत.
दरम्यान, गेराल्ड कोएत्झीनेही मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केली असून आता त्यानेही १२ बळी घेतले आहेत. म्हणजेच कोएत्झी आता चहलच्या बरोबरीत आहे. जेराल्ड कोएत्झी तिसऱ्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. खलीलने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ७ सामन्यात १० बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ८.१७ आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध कॅगिसो रबाडाने १ विकेट घेतली. मात्र या विकेटच्या जोरावर पर्पल कॅपच्या लढाईत त्याने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यानेही खलीलप्रमाणे ७ सामन्यात १० बळी घेतले आहेत. मात्र, इकॉनॉमी रेट कमी असल्याने त्याला या यादीत पाचव्या स्थानावर रहावे लागले आहे. रबाडाचा इकॉनॉमी रेट ८.३२ आहे
यानंतर सॅम करन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने मुंबईविरुद्ध गुरुवारी २ बळी घेतले. ७ सामन्यांत त्याने घेतलेल्या विकेट्सची एकूण संख्या आता १० झाली आहे. मुस्तफिजुर रहमान आणि हर्षल पटेल अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या नावावर १० विकेट्स आहेत. पॅट कमिन्स आणि अर्शदीप सिंग अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या खात्यात ९ विकेट्स आहेत.




