Encounters In Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा कुख्यात गुंड अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम याला झाशीजवळील एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आलं आहे. उमेश पाल हत्याकांड झाल्यापासून असद आणि गुलाम फरार होते. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाई दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी विकास दुबे या कुख्यात गुंडाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारलं होतं. त्यामुळं आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशात सातत्यानं एन्काऊंटर्स केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु आता योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेशात किती एन्काऊंटर झाले, याची आकडेवारीच समोर आली आहे.
योगी आदित्यनाथ २०१७ साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्याच्या विविध शहरांमध्ये तब्बल १० हजार ९३३ एन्काऊंटर केले आहेत. या सर्व एन्काऊंटरमध्ये आतापर्यंत १८३ गुन्हेगारांना ठार मारण्यात आलं आहे. पोलिसांची गोळी लागल्याने ५०४६ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व चकमकींचा विचार केला तर आतापर्यंत २३३४७ गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर एन्काऊंटर्सच्या घटनांमध्ये १३ पोलिसांचा मृत्यू झालेला आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त एन्काऊंटर्स करण्यात आले आहेत. त्यानंतर प्रयागराज, कानपूर आणि लखनौ जिल्ह्यात पोलिसांनी एन्काऊंटर केले आहेत. त्यामुळं आता उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधील गुंडाराज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर्सचा मार्ग काढला आहे, असा आरोप समाजवादी पार्टीकडून करण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीच गुंडांना आश्रय देत असून त्यामुळंच ते एन्काऊंटरच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं आहे.