मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Salman Rushdie: सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर; एक डोळा निकामी होण्याची भीती

Salman Rushdie: सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर; एक डोळा निकामी होण्याची भीती

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 13, 2022 01:02 PM IST

Salman Rushdie Health Update: न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ल्यात जखमी झालेले प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

Salman Rushdie
Salman Rushdie (REUTERS)

Salman Rushdie Health Update: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांचा एक डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. चाकूचा घाव खोलवर गेल्यानं त्यांच्या आतड्यालाही गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

न्यूयॉर्क येथील एका साहित्यिक कार्यक्रमात ७५ वर्षीय रश्दी यांच्यावर शुक्रवारी चाकूहल्ला झाला होता. त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर लगचेच कार्यक्रमस्थळी असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, त्यानंतर त्यांना तातडीनं विमानानं पेनसिल्वानिया येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रश्दी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्दी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता आहे. चाकूहल्ल्यात त्यांच्या काखेतील रक्तवाहिन्या तुटल्या आहेत. तसंच, आतड्यालाही इजा झाली आहे.

मुंबईत जन्मलेले सलमान रश्दी हे 'द सॅटेनिक व्हर्सेस' या पुस्तकामुळं वादग्रस्त ठरले होते. इस्लामी कट्टरतावाद्यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. त्यामुळं ब्रिटनमध्ये त्यांना सुरक्षाही पुरवण्यात आली होती. 

घटनास्थळी सापडली बॅग

रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव हादी मतर असं आहे. तो नेमका कोणत्या देशाचा नागरिक आहे? एखाद्या दशहतवादी संघटनेशी त्याचा संबंध आहे का? याबद्दल अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. स्थानिक यंत्रणांनी त्याबाबत चौकशी सुरू केली आहे. रश्दी यांच्यावर जिथं हल्ला झाला, तिथं एक संशयास्पद बॅग सापडली आहे. तसंच, काही इलेक्ट्रॉनिक वस्तूही आहेत. याबाबतही चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत एफबीआयची मदत घेतली जात असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग