कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आजपासून काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "काँग्रेसने ७० वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर्गे बोलत होते. कर्नाटक निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या मुद्द्यावर लढली जाणार नसून राज्याच्या मुद्द्यांवर लढली जाईल, असंही खर्गे यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. राज्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसने आपलं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले की, येथील लोकांना पंतप्रधान मोदींचा पक्ष आणि त्यांचे कार्यक्रम आवडत नाहीत. कर्नाटक निवडणुकीबाबत खर्गे म्हणाले की, आम्ही २०२४ मध्ये मोदींविरोधात लढू. मात्र कर्नाटकची निवडणूक राज्याच्या मुद्द्यांवर लढवली जाईल. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, नंदिनी या मुद्द्यांवर ही निवडणूक असेल.
भाजपवर निशाणा साधत खर्गे यांनी काँग्रेसच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की आज जेव्हा एखादी ट्रेन सुरु होते तेव्हा पंतप्रधान तिला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचतात. खरगेंनी भाजपवर काँग्रेसच्या योजनांचे नामांतर करुन उद्घाटन केल्याचा आरोप केला आहे. तसंच अशा छोट्या गोष्टींवर दावा करु नका, असंही त्यांनी सांगितलं. मोठ्या गोष्टी करा, जशा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पंचवार्षिक योजना होत्या. त्यांनी बंगळुरुला एचएएल, बीईएल, टेलिफोन उद्योग, आयटी अशा मोठ्या गोष्टी दिल्या.