मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फेसबुकवर बंदूकधारी फोटो अपलोड केला; दहा वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा
Punjab Police
Punjab Police

फेसबुकवर बंदूकधारी फोटो अपलोड केला; दहा वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा

25 November 2022, 16:16 ISTGanesh Pandurang Kadam

Punjab Police against Gun Culture: फेसबुकवर बंदूक हातात घेतलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अमृतसर इथं एका दहा वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Punjab Police action against Gun Culture: गायक सिद्धू मुसेवाला यांच्या खुनानंतर पंजाब सरकारनं शस्त्रास्त्र संस्कृती किंवा हिंसक गोष्टीस प्रोत्साहन प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अमृतसर येथील दहा वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी या कठोरतेची चुणूक दाखवली आहे. बंदूक हातात घेतलेला एक फोटो त्यानं फेसबुकवर अपलोड केला होता. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा अल्पवयीन असल्यामुळं अमृतसर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी मुलाबरोबरच त्याचे वडील व अन्य दोघांविरुद्धही बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अमृतसरच्या कथुनंगल पोलीस ठाण्यात चिमुकल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर आपल्या मुलाच्या खांद्यावर बंदूक आणि काडतुसांचा पट्टा असलेला फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पोलिसांच्या सायबर सेलच्या नजरेस पडला. पोलिसांनी तात्काळ संबंधित मुलाचा व त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. याच प्रकरणी विक्रमजीत आणि विराट या दोन व्यक्तींच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हवालदारावरही दाखल झाला होता गुन्हा

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशानंतर पंजाबमध्ये बंदूक संस्कृतीविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. याचा पहिला फटका खुद्द एका पोलीस हवालदाराला बसला होता. अल्पवयीन मुलावर आता ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, त्याच काथूनल पोलील ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल दिलजोध सिंग यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. दिलजोध यांनी एका ठिकाणी नाचताना फायरिंग करत होते. हे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झालं होतं. त्यानंतर ते अडचणीत आले होते.

९ दिवसांत जवळपास ९०० शस्त्र परवाने रद्द

पंजाब पोलिसांनी मागील अवघ्या ९ दिवसांत सुमारे ९०० शस्त्रांचे परवाने रद्द केले आहेत, तर ३०० हून अधिक जणांचे परवाने स्थगित केले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून शस्त्रांचा प्रचार करणाऱ्यांविरोधातही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, नियम मोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असं पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

विभाग