मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: शिवसेनेनं लोकसभेतील व्हीप का बदलला?; संजय राऊत यांनी सांगितलं!

Sanjay Raut: शिवसेनेनं लोकसभेतील व्हीप का बदलला?; संजय राऊत यांनी सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 07, 2022 01:58 PM IST

Sanjay Raut on Lok Sabha Chief Whip: शिवसेनेनं लोकसभेतील मुख्य प्रतोद का बदलला, या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी आज दिलं.

Bhavana Gawali - Rajan Vichare
Bhavana Gawali - Rajan Vichare

Sanjay Raut on Shiv Sena Chief Whip in Lok Sabha: पक्षांतर्गत बंडाळी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर पेचाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं काल लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी यांना त्या पदावरून डच्चू दिला. त्यांच्या जागी ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची भीती व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांनी आज ही सर्व चर्चा फेटाळून लावली.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'लोकसभेतील मुख्य प्रतोद बदलण्यामागे कुठलंही विशेष कारण नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लवकरच राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. पुढील काही काळात राष्ट्रीय पातळीवर अनेक निर्णय होणार आहेत. कामाला गती मिळण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राऊत म्हणाले.

'भावना गवळी या मुख्य प्रतोद म्हणून उत्तम काम करत होत्या. मात्र, त्यांच्या काही कायदेशीर लढाया सुरू आहेत. त्यामुळं त्यांना दिल्लीत हजर राहणं कठीण जातं. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं संसदेत येणं कमी झालं आहे. लोकसभेत चीफ व्हीपचं महत्त्व मोठं असतं. गटनेते म्हणून विनायक राऊत आहेतच, पण काही आदेश काढायचे असतात तेव्हा व्हीपची गरज भासते. या सगळ्याचा विचार करून आणि सगळ्यांशी बोलूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

अडसूळ यांच्या राजीनाम्यावर चर्चा करू!

आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. 'अडसूळ यांच्या राजीनाम्याची बातमी आम्ही सुद्धा ऐकलीय. त्यांच्यावरही अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू होती. त्यांच्या घरावर ईडीचे छापे पडले होते. भाजपकडून काही आरोप केले जात होते. अटकेच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यांनी राजीनामा दिल्याचं कळलं आहे. आम्ही पक्षपातळीवर याबाबत चर्चा करू, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या