मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete: रुग्णालयात आणलं तेव्हा विनायक मेटेंची स्थिती कशी होती? डॉक्टरांनी दिली माहिती

Vinayak Mete: रुग्णालयात आणलं तेव्हा विनायक मेटेंची स्थिती कशी होती? डॉक्टरांनी दिली माहिती

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 14, 2022 09:07 AM IST

Vinayak Mete: मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी मुंबईला जात असताना झालेल्या गाडीच्या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले.

विनायक मेटे यांचं अपघाती निधन
विनायक मेटे यांचं अपघाती निधन (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Vinayak Mete: मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद करणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. विनायक मेटे हे मराठा आरक्षणासंदर्भातील एका बैठकीसाठी मुंबईला येत होते. पनवेल खालापूर दरम्यान असणाऱ्या माडप बोगद्याजवळ अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना एमजीएम रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विनायक मेटे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांची स्थिती कशी होती याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. एमजीएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सांगितले की अपघात इतका भीषण होता की विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर तपासणी कऱण्यात आली. तिथेच त्यांना मृत असं घोषित करण्यात आलं. विनायक मेटे यांच्या डोक्याला मागच्या बाजूस गंभीर अशी जखम आहे. अशा परिस्थितीत अचानक मृत्यूची शक्यता असते. आता याबाबत शवविच्छेदनानंतर नेमकी माहिती समोर येईल. इथं आणलं तेव्हा काहीच हालचाल नव्हती, ईसीजी फ्लॅट लाइन होती. त्यानंतर विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले असंही रुग्णालय अधिष्ठात्यांनी सांगितले.

रुग्णालयात विनायक मेटे यांच्यासोबत ड्रायव्हर आणि एक पोलिस कर्मचारीसुद्धा गाडीत होते. पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर चालकाची प्रकृती सध्या ठीक आहे अशी माहितीसुद्धा डॉक्टरांनी दिली. 

मराठी समाजासाठी लढणारा नेता हरपला. आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला येत असताना त्यांचं निधन झालंय. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांची जी तळमळ होती, भावना होती त्यांच्या या भावनेसोबतच सरकार आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग