मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विनायक मेटेंचा रात्री सव्वा दोनला मेसेज आलेला, मी सकाळी वाचला : उपमुख्यमंत्री फडणवीस

विनायक मेटेंचा रात्री सव्वा दोनला मेसेज आलेला, मी सकाळी वाचला : उपमुख्यमंत्री फडणवीस

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 14, 2022 11:03 AM IST

Vinayak Mete: मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी लढला. यासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. माझ्यासाठी ते जवळचे सहकारी होते असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विनायक मेटे यांचा मध्यरात्री मेसेज आलेला - उपमुख्यमंत्री
विनायक मेटे यांचा मध्यरात्री मेसेज आलेला - उपमुख्यमंत्री

Vinayak Mete: शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. विनायक मेटे यांच्यासह बॉडीगार्ड आणि वाहनचालक सुद्धा या अपघातात जखमी झाले. विनायक मेटे यांच्या निधनानंतर एमजीएम रुग्णालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"विनायक मेटे यांचा अपघात झाल्याचे कळले, परंतू परिस्थिती लक्षात येत नव्हती. इथे आल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. त्यांचा अपघात कसा झाला याची चौकशी होईल, तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत." विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी तासभर वाट बघावी लागली असा आरोप आता होत आहे. यंत्रणांकडूनही कोणती मदत वेळेत मिळाली नाही असं चालकाने म्हटलं आहे.

संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. गरिबीतून वर येऊन स्वत:च्या भरोशावर उभा राहिलेलं नेतृत्व होतं. मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी लढला. यासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. माझ्यासाठी ते जवळचे सहकारी होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, विनायक मेटे यांनी आपल्याला रात्री सव्वादोन वाजता मेसेज केला होता अशी माहितीसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की,"रात्री सव्वादोन वाजता मेसेज केला होता. मेसेजमध्ये म्हटलं होतं की, 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावलीय त्यासाठी येतो. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाइटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो.' त्यांचा हा मेसेज आज सकाळी मी वाचला." मराठा आरक्षणासंदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते.

IPL_Entry_Point