मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्र्यांची ताकद पाचपाखाडी आणि वागळे इस्टेटपुरती; ठाणे बंदवरून संजय राऊत यांचा कडक टोला

मुख्यमंत्र्यांची ताकद पाचपाखाडी आणि वागळे इस्टेटपुरती; ठाणे बंदवरून संजय राऊत यांचा कडक टोला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 17, 2022 10:57 AM IST

Sanjay Raut on Thane Bandh : भाजप व एकनाथ शिंदे गटानं ठाण्यात आज अचानक पुकारलेल्या बंदवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला हाणला आहे.

Sanjay Raut - Eknath Shinde
Sanjay Raut - Eknath Shinde

Sanjay Raut on Thane Bandh : छत्रपती शिवाजी महाराजांसह राज्यातील महापुरुषांविरुद्ध भाजप नेते वारंवार अपमानजनक विधान करत असल्याच्या निषेधार्थ मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. त्यास उत्तर म्हणून एकनाथ शिंदे गट व भाजपनं आज अचानक ठाणे व डोंबिवली बंदची हाक दिली आहे. त्यामुळं जनतेमध्ये नाराजी असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुख्यमंत्री स्वत: ठाण्याचे आहेत. ते स्वत:चंच शहर बंद करण्याचा आदेश देतात हे पहिल्यांदाच होतंय आणि त्यांच्या बाजूला असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत बसलेत. खरंतर एकनाथ शिंदे यांची ताकद तेवढीच आहे. पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट बंद करण्याइतपकच त्यांची ताकद आहे, असा टोला राऊत यांनी हाणला. स्वत:ची जबाबदारी ओळखून त्यांनी हा बंद ताबडतोब मागे घ्यायला हवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

भाजप आणि शिंदे गटानं माफी मागितली पाहिजे!

भाजपनं ठाण्यात माफी मागो संजय राऊत आणि सुषमा अंधारे आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खिल्ली उडवली. 'त्यांच्या आंदोलनाला काही अर्थ आहे का? खरंतर भाजपवाल्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महापुरुषांचा रोजच्या रोज अपमान केला जातोय. तिकडं कर्नाटक बोंबलतोय आणि ह्यांचं वेगळंच चाललं आहे, असं दानवे म्हणाले.

ठाणे बंदची स्थिती काय?

भाजप व शिंदे गटानं अचानक ठाणे बंद पुकारल्यानं ठाणेकरांचे हाल झाले आहेत. ठाण्यात रिक्षा व महापालिकेची बस सेवा बंद आहे. वाहतूक सुरू ठेवणाऱ्या काही रिक्षावाल्यांना मारहाण झाल्याचंही वृत्त आहे. त्यामुळं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. डोंबिवलीतही शिंदे गटानं अचानक बंद पुकारला आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग