मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Rathore : “मी निष्कलंक.. शांत होतो; आता खपवून घेणार नाही, यापुढे..”, संजय राठोड यांचा इशारा

Sanjay Rathore : “मी निष्कलंक.. शांत होतो; आता खपवून घेणार नाही, यापुढे..”, संजय राठोड यांचा इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 10, 2022 08:06 PM IST

आपल्यावर केले जाणारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचललं जाईल,असा इशारा राठोडांनी दिले.

संजय राठोड
संजय राठोड

बुलडाणा – एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात मला गोवण्यात आले. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व नैतिक जबाबदारी म्हणून मी मंत्रीपदावरून पायउतार झालो होतो. त्यानंतर  पोलिसांनी तपास करून मला क्लीन चिट दिली असून मी निर्दोष आहे, यापुढे माझ्यावर जर आरोप झाले तर कायदेशीर मार्गाने उत्तर देईन, असा इशारा मंत्री संजय राठोड  (Sanjay rathore) यांनी दिला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा दुर्दैवी असल्याचं  व आपला लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

यावेळी राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्यावर अशाप्रकारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असे संकेत राठोडांनी दिले.

संजय राठोड म्हणाले की, मी चारवेळा विधानसभेत मोठ्या मताने निवडून येतो तेव्हा मला मंत्रीपदाची शपथ मिळाली. मागच्या सरकारमध्येही मी मंत्री होतो. पण एक घटना घडली त्यावरुन माझ्यावर गंभीर आरोप झाले. ती घटना झाल्यानंतर नैतिक जबाबदारी घेऊन मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  करत त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. 

IPL_Entry_Point