मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना कर्णदोष झालाय की…; 'सामना'तून जहरी शब्दांत टीका

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना कर्णदोष झालाय की…; 'सामना'तून जहरी शब्दांत टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 28, 2022 10:53 AM IST

Saamana Slams Devendra Fadnavis : शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाकडं देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Saamana Slams Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या गाजत आहेत. मात्र, सरकारकडून विरोधकांच्या आरोपांना फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसत आहे. विरोधकांचे बॉम्ब हे लवंगी फटाकेही नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून फडणवीसांवर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. 'भ्रष्टाचार विरोधी बॉम्बचा आवाज फडणवीसांना ऐकू येत नसेल तर त्यांना राजकीय कर्षदोष झालाय किंवा त्यांची संस्कृती व संस्कार बदललेत असंच म्हणावं लागेल, असा खोचक टोला शिवसेनेनं हाणला आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

  • फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली करावी लागते. विधानसभेत विरोधकांकडून रोज भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फोडले जात आहेत. फडणवीस यांना ते ऐकू जात नसतील तर तो त्यांचा राजकीय कर्णदोष म्हणावा लागेल. 
  • महाविकास आघाडीच्या नाकासमोरून सरकार पळवून नेल्याचं सांगणाऱ्या फडणवीसांनाही नाक आहे व त्याच नाकासमोर एनआयटी भूखंडांचा घोटाळा झाला. ११० कोटींचे भूखंड आजच्या मुख्यमंत्र्यांनी दोन कोटींत बिल्डरांना दिले. या सर्व व्यवहारावर हायकोर्टाने ताशेरे ओढले. म्हणजे गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाला. त्याचं फडणवीसांना काहीच वाटत नसेल तर ते सरकारच्या निर्ढावलेपणाचं लक्षण आहे. फडणवीस हे कोणत्या जादूटोण्याच्या दबावाखाली काम करीत आहेत? की विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध फोडलेले बॉम्ब त्यांना अस्वस्थ करीत नाहीत.
  • शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अब्दुल सत्तार यांनी ३७ एकर गायरान जमिनीचं वाटप एका खासगी व्यक्तीला केलं व त्या व्यवहारावरही उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. हा नवा बॉम्बही फडणवीस यांना लवंगीच्या तोडीचा वाटला नाही. आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असंच फडणवीस यांना सांगायचं आहे काय? 
  • संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत व ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचं काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारखे नेते करत आहेत. 
  • अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण विरोधकांनी काढले. सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कृषी प्रदर्शन भरवलं असून त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कुपन विक्री करून १५ कोटी गोळा करून आणण्याचं टार्गेट दिलं आहे. इतकं गंभीर प्रकरणही फडणवीस यांना विचलित करत नसेल तर त्यांची संस्कृती व संस्कार बदलले आहेत. कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात.

IPL_Entry_Point