मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anna Hazare : अण्णा, उठा आता… सोशल मीडियावर मीम्सची धम्माल

Anna Hazare : अण्णा, उठा आता… सोशल मीडियावर मीम्सची धम्माल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 07, 2023 01:23 PM IST

People appeal Anna Hazare to protest against Adani group : देशातील आघाडीचा उद्योगसमूह असलेल्या अदानी ग्रुपवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर सोशल मीडियात अण्णा हजारे अचानक चर्चेत आले आहेत.

Anna Hazare
Anna Hazare

Anna Hazare Memes viral : भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं आठ वर्षांपूर्वी समाजमन ढवळून काढणारे व सत्तापालटास कारण ठरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे त्यानंतर एक प्रकारे मौनात गेले आहेत. अपवाद वगळता अण्णांनी कुठल्याही प्रश्नावर मोठं आंदोलन केलेलं नाही. त्यामुळं भाजप विरोधकांच्या ते सातत्यानं निशाण्यावर असतात. हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं अदानी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा अण्णा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नावानं मीम्स फिरू लागले आहेत. सोशल मीडियावर लोक त्यांना आंदोलनासाठी आवाहन करत आहेत.

अदानी समूहावर झालेल्या गैरव्यवहाराचा संबंध विरोधकांनी थेट मोदी सरकारशी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या कृपाआशीर्वादानंच अदानी यांचं साम्राज्य उभं राहिलं आणि त्यांच्या सरकारच्या मेहेरबानीमुळंच अदानींनी सामान्य जनतेचे पैसे बुडवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, तर काँग्रेसनं देशभर अदानीच्या विरोधात आंदोलनं सुरू केली आहेत. मात्र, देशातील आघाडीच्या उद्योगपतीवर घोटाळ्याचे इतके मोठे आरोप होऊनही अण्णांसारखे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते साधी चौकशीची मागणी करत नाहीत. त्यावरून आता लोक त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत.

Anna Hazare
Anna Hazare

दिल्लीतील आंदोलनातला अण्णा हजारे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, 'अण्णा, उठा आता देशात खूप मोठा घोटाळा झालाय', अशी विनवणी त्यांना केली जात आहे. अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकानं मैदानात उतरून सरकारला धारेवर धरावं, अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत.

यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांनी अण्णा हजारे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आली आहे. देशात भाजपचं सरकार असल्यानं अण्णा आंदोलनं करत नाहीत. ते भाजपच्या इशाऱ्यावरून आंदोलनं करतात, असे आरोपही करण्यात आले आहेत. अदानी समूहावरील अहवालानंतर आता अण्णा हजारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग