Pankaja Munde : तर कॉम्प्रोमाइज करणार नाही; पंकजा मुंडे यांनी मांडली परखड भूमिका
Pankaja Munde on Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातील तडजोडीबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे.
Pankaja Munde on Politics : नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या एका मुलाखतीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. या मुलाखतीत पंकजा यांनी सध्याच्या राजकारणात त्यांना असलेलं स्थान, मिळत नसलेल्या संधीविषयी देखील स्पष्ट भाष्य केलं.
ट्रेंडिंग न्यूज
नाशिकमधील व्ही प्रोफेशनल्स या संस्थेतर्फे आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 'ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले, त्या समाजासाठी काम करण्याची, समर्पण करण्याची मला मुभा नसेल तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य होणार नाही, असं पंकजा यांनी यावेळी स्पष्ट केलं. 'काही तरी मिळेल म्हणून यासाठी झुकणं माझ्या रक्तात नाही. तो दोष मुंडे साहेबांचा आहे. कारण, ही शिकवण त्यांनीच मला दिली आहे. तेच आमच्या रक्तात आहे,' असंही त्या म्हणाल्या.
मागील काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सातत्यानं डावललं जात आहे. त्यामुळं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. राजकारणातील संधीबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, 'आतापर्यंत मला संधी देणाऱ्यांनी ती का दिली? आणि आता ती मिळत नसेल तर का नाही? याचं उत्तर संधी देणारे किंवा नाकारणारेच देऊ शकतात. मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही,' असं सूचक विधान त्यांनी केलं.
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल एकाच गाडीतून आले. त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. त्याबाबत पंकजा मुंडे यांनी मत मांडलं. 'एका पक्षाच्या नेत्यानं दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी बोलणं, त्यांच्या समारंभात जाणं. बरोबर गाडीत बसणं या गोष्टींतून काही अर्थ काढण्याची गरज नाही. शरद पवार हे सीनियर नेते आहेत. त्यांच्यासोबत जाताना त्यांच्या गाडीत बसणं हा नम्रपणा आहे, असं त्या म्हणाल्या. 'राजकारणात कुणी कुणावर वैयक्तिक चिखलफेक करू नये, असं मतही त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर बोलताना मांडलं.
माझं व्यक्तिमत्त्व भीष्म पितामहाच्या जवळ जाणारं
माझं व्यक्तिमत्त्व महाभारतातील पितामह भीष्म यांच्या जवळ जाणारं आहे. आपल्या वडिलांना दिलेला शब्द ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले होते. माझीही तीच तयारी आहे. भीष्म पितामहाच्या वाट्याला जे आलं, तेच आता माझ्या वाट्याल आलं आहे, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.