मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election : निकालापूर्वीच खडसे समर्थकांचा जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक

MLC Election : निकालापूर्वीच खडसे समर्थकांचा जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 20, 2022 08:18 PM IST

विधानपरिषदेची ही निवडणूक खडसे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. खडसे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात ते विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लागले आहेत.

निकालापूर्वीचखडसे समर्थकांचा जल्लोष
निकालापूर्वीचखडसे समर्थकांचा जल्लोष

जळगाव - महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election २०२२) प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर घेतलेले आक्षेप फेटाळल्यानंतर सुमारे दोन तास विलंबाने मतमोजणीला सुरुवात झाली. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या निकालाकडे जळगावकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

विधानपरिषदेची ही निवडणूक खडसे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. खडसे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात ते विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लागले आहेत. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून, यासाठी मतदान झाले आहे. काही वेळातच निकाल लागणार आहे. तथापि, याआधीच  खडसेंचा बालेकिल्ला मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावरून खडसे यांचा विजय निश्चित आहे याची खात्री असल्याचेच हे फलक सांगत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

विधानभवन परिसरात खडसे समर्थकांचा जल्लोष -

 एकनाथ खडसे यांचे समर्थक हे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. या समर्थकांना एकनाथ खडसे यांचा विजय निश्‍चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे. विधानभवन परिसरात खडसे समर्थकांकडून घोषणाबाजीही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे. 

IPL_Entry_Point