मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS Leader Slaps Woman : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पदाधिकाऱ्यासह तिघांची मनसेतून हकालपट्टी

MNS Leader Slaps Woman : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पदाधिकाऱ्यासह तिघांची मनसेतून हकालपट्टी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 02, 2022 05:08 PM IST

मुंबादेवी परिसरात मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाची पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मनसेची कारवाई
मनसेची कारवाई

मुंबई – मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अजून पोलिसांनी विनोद अरगिले यांच्यासह राजू अरगिले व सतीश लाड या दोघांना ताब्यात घेतले आहे.

आता मनसेकडून याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाबत पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे, असे नांदगांवकर म्हणाले. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

बाळा नांदगांकरांनी लिहिलेले पत्र -

एक सप्टेंबर २०२२ रोजी कामाठीपुरा, मुंबादेवी या परिसरात घडलेली घटना पाहून मन विषन्न झाले. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाबत पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे.

पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात येत आहे.

भविष्यात या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेऊन व सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे...
धन्यवाद!

काय आहे घटना -

मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप मेडिकल शॉपसमोर उभारण्यावरुन एका महिलेला मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिले यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी मारहाण केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार नागपाडा पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम ३२३, ३३७, ५०६, ५०४, ५०९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबादेवी परिसरात गणेश उत्सवासाठी मंडप उभारण्याच्या कारणावरून भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. मुंबादेवी परिसरात एका मंडळाच्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होता. त्यासाठी व बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांसमोर बांबू ठाकले जात होते. त्यावेळी एका मेडिकल शॉपसमोर बांबू लावण्यास पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली.

IPL_Entry_Point