मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 07, 2023 10:49 PM IST

Shashikant pawar passed away : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शशिकांत पवार
शशिकांत पवार

Shashikant Pawar Passed Away :  अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा समाजासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पवार आज मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठा समाजाप्रति समर्पित आणि कायम अग्रेसर असणारे नेते होते. मराठा महासंघाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे शशिकांत पवार यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. कोकणातून कारने परत येत असताना संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ओळख होती. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता. 

रत्नागिरी मराठा बिझनसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून कोकणात गेले होते. आज संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे  दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही त्यांनी आंदोलन केले. मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्यामुळे ते सतत विवंचनेत होते. मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरु केले होते.

IPL_Entry_Point