मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत? एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा

राज ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत? एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 27, 2022 09:50 AM IST

राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणामुळे तर्कवितर्कांच्या चर्चेला उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी फोनवरून दोन वेळा चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेत्याकडून याची माहिती देण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणामुळे तर्कवितर्कांच्या चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत एकनाथ शिंदेंची चर्चा झाली आहे. दोनवेळा फोनवरून बोलल्याची माहिती समजते. राज ठाकरे हे नुकतेच रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली होती. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस फोनवरून केली अशीही माहिती मनसे नेत्याने दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना गट स्थापन केल्याशिवाय पुढची वाटचाल करणं सध्याच्या परिस्थितीत कठीण आहे. त्यांना गट दुसऱ्या कोणत्यातरी पक्षात विलीन करण्याचा पर्यायही असेल. यातच राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानं एकनाथ शिंदे यांचा गट राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या