Maharashtra State Education Board : शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. सध्या शिकवली जाणाऱ्या पुस्तकांचं २०२४-२५ हे अखेरचं शैक्षणिक वर्ष असणार आहे. २०२५-२६ म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. पहिली व दुसऱीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं दिली जाणार आहेत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी ही माहिती दिली आहे
बालभारतीकडून सांगण्यात आले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी, पहिली आणि दुसरी या वर्गांसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकांसाठी सुरू असलेले शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे शेवटचे वर्ष राहणार आहे. त्यामुळे पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्याची सूचनाही कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या, सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण चार भागांत उपलब्ध करून देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित, खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगू, सिंधी, तमीळ, बंगाली या माध्यमांसाठी, सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यकतेनुसार वह्यांची पाने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी एकूण १० माध्यमातून आणि सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
संबंधित बातम्या