मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; अॅट्रॉसिटी प्रकरणात ठाणे कोर्टाचा दणका

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; अॅट्रॉसिटी प्रकरणात ठाणे कोर्टाचा दणका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 20, 2022 02:26 PM IST

विशिष्ट समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळे
केतकी चितळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केल्यामुळं सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अॅड. नितीन भावे या नावानं शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट केतकीनं व्हायरल केली होती. या प्रकरणी तिला न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी २०२० च्या एका प्रकरणात तिला ताब्यात घेतलं होतं. तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं तिला २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

काय आहे नवे प्रकरण?

केतकी चितळे हिनं २०२० साली सोशल मीडियात अनुसूचित जातीच्या व्यक्तीविरोधात एक पोस्ट केली होती. या प्रकरणी तिच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅड. स्वप्नील जगताप यांनी केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी चौकशीसाठी केतकीला ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतलं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळे हिच्या विरोधात आतापर्यंत कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीड जिल्ह्यातील आंबेजोगई, मुंबईतील गोरेगाव व पवई, नाशिक व अमरावती इथं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वादग्रस्त पोस्ट करण्याची केतकी चितळेची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिनं अनेकदा आक्षेपार्ह व अपमानजनक पोस्ट केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळं ती एकदा वादात अडकली होती. तसंच, मोफत लोकलमध्ये फिरायला मिळतं आणि मुंबई बघायला मिळते म्हणून एका समाजाची लोक येत असतात, असंही वक्तव्य तिनं केलं होतं.

IPL_Entry_Point