मराठी बातम्या  /  Sports  /  Ipl 2023: Ms Dhoni Form Very Important For Chennai Super Kings

MS Dhoni: धोनीचा फॉर्म चेन्नईच्या संघासाठी महत्त्वाचा, मागील तीन हंगामातील प्रदर्शनावर एक नजर

MS Dhoni Farewell Match
MS Dhoni Farewell Match
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Mar 28, 2023 01:50 PM IST

IPL 2023: महेंद्रसिंह धोनीचे फॉर्ममध्ये परतणे चेन्नईच्या संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Chennai Super Kings: भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. सुरूवातीपासून धोनीच्या खांद्यावर चेन्नईच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, गेल्या वर्षी रवींद्र जाडेजाला चेन्नईच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, अर्ध्या हंगमातच रवींद्र जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने धोनीने पुन्हा संघाची सुत्रे हाती घेतली. आयपीएलच्या आगामी हंगामातही धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, धोनीचा फॉर्म चेन्नईच्या संघासाठी अतिशय महत्वाचा असून त्याच्या मागील तीन हंगामातील प्रदर्शनावर एक नजर टाकुयात.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, धोनीने आयपीएलच्या मागील तीन हंगामात एकूण ४४ सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या बॅटीमधून एकूण ५४६ धावा निघाल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २४.८१ आणि स्ट्राइक रेट ११६.९१ होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, एमएस धोनीची आयपीएलमधील कामगिरी गेल्या तीन वर्षांत अत्यंत खराब ठरली. चेन्नईच्या संघाने धोनीला मागील तीन हंगामात जवळपास ६० कोटी मानधन दिले आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, धोनीला एका धावेसाठी किती रुपये मिळाले आहेत.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नईच्या संघाचा भाग आहे. त्याने चेन्नईच्या संघासाठी आतापर्यंत २३४ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ४ हजार ९८७ धावा आहेत. ज्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. अखेरच्या काही षटकात सामन्याचे रुप बदलणाऱ्या धोनीच्या नावावर एकूण २२९ षटकारांची नोंद आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलच्या चार ट्रॉफी जिंकल्या आहेत.

महेंद्र सिंह धोनीने ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने ६ शतक, एक द्विशतक आणि ३३ अर्धशतकांच्या मदतीने ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १० हजार ७७३ धावांची नोंद आहे. यामध्ये १० शतक, ७९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने एकूण १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे.

WhatsApp channel

विभाग