मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anand Dave : देशातला मतदार आणि कोर्ट हिंदुत्त्ववादी विचारांचेच; आनंद दवेंचं वादग्रस्त वक्तव्य

Anand Dave : देशातला मतदार आणि कोर्ट हिंदुत्त्ववादी विचारांचेच; आनंद दवेंचं वादग्रस्त वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 16, 2022 03:56 PM IST

Anand Dave On Vande Mataram : गेल्या ७० वर्षांत भारतात हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.

Vande Mataram Slogan And Maharashtra Politics
Vande Mataram Slogan And Maharashtra Politics (HT)

Vande Mataram Slogan And Maharashtra Politics : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांनी फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात करावी, असे आदेश दिल्यानंतर आता त्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर आता त्यांना ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी पाठिंबा देत धक्कादायक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे.

'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात करण्याच्या मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयाला योग्य ठरवत या निर्णयाचं स्वागत करायला हवं, उगाचच टीका करण्यात काही अर्थ नाही, अशी भूमिका महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले की, राज्यातील सर्वच खात्यांमध्ये हा निर्णय राबवण्यात येईल, असा निर्णय मुनगंटीवारांनी घ्यायला हवा, केवळ एकाच मंत्र्यानं असा निर्णय घेऊन चालणार नाही, याशिवाय सध्या केंद्रातही भाजपचं सरकार असल्यानं त्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत अनुकरण करायला हवं, असं दवे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मुस्लिमांना या घोषणेबाबत आक्षेप नाही...

सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली, कारण त्यांच्या विधानसभा मतदारसंघात बहुतांश मुस्लिम समाजाचे लोक आहेत, मुस्लिम समाजाला या निर्णयाबाबत कोणताही आक्षेप नसून आव्हाड केवळ नेतृत्त्व टिकवण्यासाठीच या निर्णयाला विरोध करत असल्याचं दवेंनी म्हटलं आहे.

देशातील मतदार हिंदुत्ववादी...

देशातील मतदार हा हिंदुत्ववादी झाला असून कोर्टाचे निर्णयही तसेच येताना दिसत आहे. गेल्या ७० वर्षात देशातील हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याचा धक्कादायक दावा आनंद दवेंनी केला आहे. याशिवाय 'वंदे मातरम' म्हणण्याच्या निर्णयावर कुणाचा आक्षेप असेल तर तो त्यांनी नोंदवावा, परंतु देशातील मतदार जागरुक असून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो, असं दवेंनी स्पष्ट केलं आहे.

कॉंग्रेसचा जय बळीरामचा नारा...

राज्यात वंदे मातरम च्या घोषणेवरून निर्माण झालेल्या वादानंतर आता कॉंग्रेसनंही जय बळीरामची घोषणा दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याविशषयी बोलताना म्हटलंय की, देशात शेतकऱ्यांची संख्या जास्त असून वंदे मातरम ही घोषणा देशाचा स्वाभिमान तर आहेच परंतु शेतकरी देशाचा पोशिंदा असल्यानं जय बळीराम म्हणायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग