मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse: खडसेंना भाजपमध्ये परतायचंय, पण…; गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

Eknath Khadse: खडसेंना भाजपमध्ये परतायचंय, पण…; गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 04, 2022 10:54 AM IST

Eknath Khadse: गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, आम्ही अमित शहांच्या भेटीसाठी गेलो होतो पण त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (HT PHOTO)

Eknath Khadse: महाराष्ट्रात एकेकाळी भाजपमध्ये वरिष्ठ नेते राहिलेले आणि आता राष्ट्रवादीत असणारे एकनाथ खडसे हे घरवापसीसाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर दिल्लीत आल्यानंतर तीन तास अमित शहा यांच्या भेटीसाठी वाट पाहिली, मात्र वेळ मिळाली नाही. यामुळे ते अजूनपर्यंत भाजपमध्ये येऊ शकलेले नाहीत आणि नाराज असल्याचं म्हटलं जातंय. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत दावा केला आहे. महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आनंदी नाहीत. ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना सतत घरवापसीचे संकेत देत आहेत. एकनाथ खडसे हे त्यांची सून रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीत गेले होते आणि अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता.

गिरीश महाजन म्हणाले की, "मला समजले की एकनाथ खडसे त्यांच्या सूनेसह अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र अमित शहा यांच्या ऑफिसबाहेर तीन तास बसूनही भेटीला वेळ मिळाली नाही. ही गोष्ट मला दुसरं तिसरं कुणी नाही तर रक्षा खडसे यांनी सांगितली आहे." इतका वेळ वाट पाहूनही जर अमित शहा खडसे यांची भेट घेत नसतील तर हे स्पष्ट आहे की भाजप त्यांना परत घेऊ इच्छित नाही असंही महाजन म्हणाले.

नुकतंच आम्ही एका कार्यक्रमात भेटलो होतो, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आपल्यातले मतभेद दूर करायला हवेत आणि मला भाजपमध्ये परत यायचं आहे. तेव्हा मी मंत्रिमंडळ विस्तारानंतर यावर बोलू असं सांगितलं होतं असंही महाजन म्हणाले. खडसे हे ४० वर्षांपर्यंत पक्षात होते. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यानंतरही ते समाधानी झाले नाही आणि पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले. आता तिथेही ते नाराज आहेत. खडसे जिथेही जातात तिथे ते असमाधानी का राहतात? असा प्रश्नही महाजन यांनी उपस्थित केला. एकनाथ खडसे यांनीही मान्य केलं की त्यांनी अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र भेट होऊ शकली नाही. पण तीन तास वाट पाहिल्याची गोष्ट फेटाळून लावली.

खडसेंनी सांगितलं की, मी आणि माझ्या सुनेने अमित शहांची भेट घेण्यासाठी तीन तास वाट पाहिली हे खरं नाही. आम्ही अमित शहांच्या भेटीसाठी गेलो होतो पण त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रक्षा यांच्याशी चर्चेनंतर गिरीश महाजन हे वाढवून सांगत आहेत. रक्षा यांनी महाजन यांना तीन तास वाट पाहिल्याचं सांगितलं नाहीय.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग