मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dadar Railway Station: दादर स्थानकातील गर्दी विभागली जाणार; 'हा' आहे मध्य रेल्वेचा प्लान

Dadar Railway Station: दादर स्थानकातील गर्दी विभागली जाणार; 'हा' आहे मध्य रेल्वेचा प्लान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 29, 2022 11:13 AM IST

Mumbai Local Train: मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

Dadar Railway Station
Dadar Railway Station

Dadar Railway Station: मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वात बिझी स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दी कशी विभागली जाईल यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं गांभीर्यानं विचार सुरू केला आहे. त्यासाठी दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचं रुंदीकरण करण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या जलद गाड्यांतील प्रवाशांना दादर स्थानकात दोन्ही बाजूंनी चढता-उतरता यावं हा यामागचा उद्देश आहे.

दादर स्थानकात मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीसाठी सहा प्लॅटफॉर्म आहेत. जलद गाड्यांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवरून लांब पल्ल्याच्या गाड्याही धावतात. दादर स्थानकात दररोज जवळपास ५ लाख प्रवासी ये-जा करतात. येथून दिवसाला २२६ गाड्या जातात, त्यातील ५० टक्के ट्रेन कल्याणच्या दिशेने जातात. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून लांब पल्ल्याच्या २५ गाड्या धावतात.

प्लॅटफॉर्म १ आणि २ हे स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहेत. यातील प्लॅटफॉर्म १ वरून सीएसएमटी-कल्याण आणि परळ-कल्याणच्या दिशेनं गाड्या जातात. प्लॅटफॉर्म दोन हा दादरहून कल्याणच्या दिशेनं सुटणाऱ्या गाड्यांसाठी आहे.

प्लॅटफॉर्म ३ आणि ४ हे देखील स्वतंत्र आहेत. तीन वरून सीएसएमटी व परळकडे जाणाऱ्या स्लो लोकल धावतात. तर, प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या वेगवान गाड्या थांबतात. प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि प्लॅटफॉर्म ५ मध्ये काही फूट अंतर आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून लांब पल्ल्याच्या गाड्याही धावतात. मात्र, या दोन्ही मध्ये एक कुपण आहे.

दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तीन आणि चारवर एकाच वेळी गाड्या येतात, तेव्हा प्रचंड गर्दी होते आणि चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचची रुंदी वाढवणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. तसं झाल्यास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येणाऱ्या जलद गाड्यांतील प्रवासी चार आणि पाच या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उतरू आणि चढू शकतील. यामुळं प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारवरील गर्दी विभागली जाईल, असं रेल्वे प्रशासनाचं नियोजन आहे. मात्र, प्लॅटफॉर्म रुंदीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तिथं उपलब्ध जागेचा आढावा घ्यावा लागणार आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

IPL_Entry_Point