मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agnipath: 'अग्निपथ' ही बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा; काँग्रेस, NCP चा घणाघात

Agnipath: 'अग्निपथ' ही बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा; काँग्रेस, NCP चा घणाघात

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 17, 2022 04:56 PM IST

Agnipath: भारतीय लष्करानं आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. ही तरुणांची थट्टा असल्याची टीका या पक्षांनी केली आहे.

Rajnath Singh
Rajnath Singh (HT_PRINT)

Congress, NCP against Agnipath: भारतीय लष्करातील भरतीसाठी मोदी सरकारनं आणलेल्या 'अग्निपथ' योजनेला देशभरात तीव्र विरोध होत आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये या योजनेच्या विरोधात शेकडो तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या योजनेवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना म्हणजे बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे यांनी या योजनेतील त्रुटींकडं लक्ष वेधून यात बदल करण्याची मागणी केली आहे. 'चार वर्षांसाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी आहे. ही योजना आणून मोदी सरकारनं देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे. एकीकडे 'वन रँक वन पेंशन' अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडं बेरोजगार तरुणांसाठी 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' आणतात. त्यामुळं ही योजनाच बंद करून केंद्र सरकारनं तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

'या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध आहे, असं महेश तपासे म्हणाले.

प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदी सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी 'अग्निपथ' ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच वय वर्षे साडेसतरा ते २३ ही तरुणांची उमेदीची वर्षं असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढं काय करायचं? असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

काँग्रेसचाही विरोध

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आणखी एक अविचारी व मनमानी निर्णय घेतला आहे. ‘अग्निपथ’ या गोंडस नावाखाली लष्करी सेवेत केवळ ४ वर्षांची नोकरी म्हणजे तरुण पिढीचं भवितव्य अंधःकारात ढकलण्याचा प्रयत्न आहे. या तरुणांना चार वर्षांची सेवा करून पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय तरुणांची क्रूर थट्टा करणारा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या