मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची महापूजा

Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची महापूजा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 10, 2022 07:58 AM IST

बळीराजाला चांगले दिवस येऊ दे अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाला सोन्याचा मुकूटही अर्पण करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा (हिंदुस्तान टाइम्स)

अवघे गरजे पंढरपूर, जाहला नामाचा गजर असं म्हणंत गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे आषाढी वारी (Ashadhi Wari) करण्यास काहीश्या दुरावलेल्या वारकऱ्यांनी यंदा मात्र पुन्हा एकदा त्याच जोमानं पायी वारी करत पांडुरंगाचं (Vitthal) दर्शन घेतलं. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे,एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा अशा चार पिढ्यांनी पांडुरंगाची मनोभावे पूजा केली. यंदाच्या विठ्ठलाच्या पुजेचा मान गेवराईच्या नवले दांपत्याला मिळाला. त्यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत पांडुरंगांची पूजा केली.

यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ही पूजा करण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यातल्या १२ कोटी जनतेच्या वतीनं आपण ही पूजा करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याच्या विकासाची पताका उंच फडकू दे, राज्यात बळी राजाला चांगले दिवस येऊ दे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. त्याशिवाय राज्यात पावसानं चांगलाच जोर पकडला आहे मात्र पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणार नाही अशी अपेक्षा त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली. राज्यात मोठे प्रकल्प उभे करा तुम्हाला कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता होणार नाही असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. त्याशिवाय राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी आपण निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. 

राज्यात नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानं कोणत्याही घोषणा करण्याचं टाळावं, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास हरकत नसली तरी निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करावं अशा अटी शर्थींसह मुख्यमंत्र्यांना पंढरीत दाखल व्हावं लागलं.

बीडच्या नवले दांपत्याला विठ्ठल पूजेचा मान

गेली ३५ वर्ष पंढरीची वारी करणाऱ्या बीडच्या गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई नवले या दांपत्याला विठ्ठल पूजेचा मान मिळाला. या प्रसंगी बोलताना नवले दांपत्यानं समाधान व्यक्त केलं. आपला परिवार मुलाबाळांनी भरलेला आहे त्यांच्यावर कृपा ठेवावी असं मुरली नवले म्हणाले तर दरवर्षी तुझ्या दर्शनाला येण्यासाठी आमचे पाय चांगले ठेव असं आपण विठ्ठल चरणी मागितल्याचं जिजाबाई नवले म्हणाल्या.

IPL_Entry_Point

विभाग