मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amol Mitkari: सरकार कोसळणार म्हणूनच राज्यपालांचा काढता पाय; अमोल मिटकरींचे टीकास्त्र

Amol Mitkari: सरकार कोसळणार म्हणूनच राज्यपालांचा काढता पाय; अमोल मिटकरींचे टीकास्त्र

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2023 06:59 PM IST

Amol Mitkari On Bhagat Singh Koshyari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर टीका केली आहे.

amol Mitkari
amol Mitkari

Amol Mitkari On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीन राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केली. येत्या 26 जानेवारीपर्यंत किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांना माघारी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भगतसिंह यांच्या टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आणि महापुरुषांचा अपमान केल्यानंतर राजपालांना उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

एबीपी माझाशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी यापूर्वीच महाराष्ट्र सोडायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरी गोष्ट म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कोसळणार, याआधीच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे.”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

IPL_Entry_Point