Nadi Shodhan Pranayam for Healthy Heart: आजकालच्या या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुले असो वा तरुण, कमी वयात हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत आहे. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, हृदयाचे असामान्य ठोके, हृदयाच्या वॉलव्ह संबंधी समस्या, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे इत्यादी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शिवाय कमी वयात हार्ट अटॅकचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे कारण अनुवांशिक देखील असू शकते. परंतु त्यांची टक्केवारी कमी आहे.
हृदयाच्या समस्यांचे मूळ कारण मानसिक आणि भावनिक असंतुलन आहे. आधुनिक पाश्चात्य वैद्यकीय विज्ञान हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्यांचे त्वरित निदान करण्यात मदत करून जीव वाचवते. पण त्याची मूळ कारणे दूर करत नाहीत. मानसिक आणि भावनिक असंतुलनावर कायमस्वरूपी उपाय देणारा योग हा एकमेव उपाय आहे. योगा त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा त्रास आहे. यासाठी नाडीशोधन प्राणायाम अत्यंत फायदेशीर ठरतो. या योगासनाला अनुलोम विलोम प्राणायाम असेही म्हणतात.
नाडीशोधन किंवा अनुलोम-विलोम प्राणायामाची पद्धत
हे प्राणायाम करण्यासाठी पद्मासन, सिद्धासन, सुखासन किंवा खुर्चीवर पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवून बसा. दोन्ही हात गुडघ्यावर घट्ट ठेवा. आता तुमचा उजवा हात वर करा आणि त्याचा अंगठा उजव्या नाकपुडीवर आणि अनामिका डाव्या नाकपुडीवर ठेवा. तर्जनी आणि मधली बोटे कपाळावर किंवा तळहातावर दुमडून घ्या. करंगळी सरळ ठेवा. यानंतर डाव्या नाकपुडीतून दीर्घ, संथ आणि खोल श्वास घ्या. पूर्ण श्वास घेतल्यानंतर डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून दीर्घ आणि संथ श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडल्यानंतर लगेच उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीतून बाहेर सोडा.
हे नाडीशोधन प्राणायामाचे एक चक्र आहे. सुरुवातीला त्याच्या सहा चक्रांचा सराव करा. हळूहळू त्याच्या चक्राचा सराव सहाच्या पटीत वाढवला पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)