Ole Aale Marathi Movie Review: मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक नव्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली आहे. यातच एका चित्रपटाची विशेष चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ओले आले’ या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात बाजी मारली आहे. या चित्रपटाच हटके नाव आणि हटके कथानक प्रेक्षकांना मनोरंजक वाटलं आहे. बाप लेकाच्या हळव्या नात्याची कथा एका हटक्या अंदाजात ‘ओले आले’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. चला तर, जाणून घेऊया कसा आहे ‘ओले आले’ हा चित्रपट...
‘ओले आले’ हे नाव ऐकून प्रेक्षकांना सुरुवातीलाच प्रश्न पडतो, की याचा नेमका अर्थ काय आहे. मात्र, चित्रपट सुरू होताच क्षणी या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळतं. ‘ओले आले’ ही कथा आहे, ओमकार लेले आणि आदित्य लेले या बाप लेकाच्या जोडीची... कुटुंब आणि जोडीदार यांच्यात एका नात्याला अधिक प्राधान्य देऊन आपण नेहमीच गल्लत करतो. याचा शहाणपणा येईपर्यंत कदाचित फार उशीर झालेला असतो. आदित्य आणि ओमकार लेले यांच्या आयुष्यात देखील असाच एक काळ येतो. आई वडील जेव्हा वृद्धत्वाकडे झुकलेले असतात, तेव्हा त्यांचं आयुष्य रीत असल्यासारखं त्यांना वाटू लागतं. मात्र, त्याच काळात त्यांची तरुण मुलं करिअर आणि पैशासाठी अहोरात्र मेहनत करत असतात. यामुळे त्यांना न स्वतःला द्यायला वेळ असतो, ना आपल्या कुटुंबाला द्यायला वेळ असतो.
तरुण मुलगा आणि वृद्धत्वाच्या दिशेने झुकणारे वडील यांच्याच नात्यावर ‘ओले आले’चं कथानक बेतलेलं आहे. एकीकडे आदित्य लेले आपल्या करिअरसाठी धावताना दिसत आहे. तर, दुसरीकडे त्यांचे वडील ओमकार लेले हे एक निवृत्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना सतत वाटतं असतं की आपल्या मुलाने थोडा आराम करावा आणि इतर गोष्टींनाही वेळ द्यावा. ते सतत आपल्या मुलाला समजावत राहतात. मात्र, या दरम्यान त्यांच्यात अशा अनेक गोष्टी घडतात, ज्यामुळे त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे.
‘ओले आले’ या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथालेखन विपुल मेहता यांनी केलं आहे. कथेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बाप लेकाची गोष्ट कथेचा धागा पकडूनच पुढे जाते. या कथेत मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला ‘बाबुराव’ आणि सायली संजीवने साकारलेली ‘कियारा’ ही पात्र या कथेला आणखी खुमासदार बनवतात. नाना पाटेकर यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तर, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने देखील मुलाच्या भूमिकेत तरुणाईचं प्रतिनिधत्व केलं आहे. कधी हसवणारा, तर कधी डोळ्यात अश्रू आणणारा हा ‘ओले आले’ प्रवास शेवटपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे.
चित्रपट: ओले आले
दिग्दर्शक: विपुल मेहता
कलाकार: नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे
संबंधित बातम्या