मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Y चा थरारक ट्रेलर आला! चित्रपटप्रेमींची उत्कंठा शिगेला

Y चा थरारक ट्रेलर आला! चित्रपटप्रेमींची उत्कंठा शिगेला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 13, 2022 05:50 PM IST

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटप्रेमींच्या डोक्यांत अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या 'वाय' (Marathi Movie Y Trailer) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Y Trailer Release
Y Trailer Release

Marathi Movie Y Trailer: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या 'वाय' या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिची या सिनेमात प्रमुख भूमिका असून निर्मिती कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केलं आहे. पहिल्या पोस्टरपासूनच 'वाय' सिनेमा चर्चेत आहे. या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची ही कहाणी आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळं उत्सुकता वाढली आहे.

'वाय'चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्या प्रश्नांची उत्तरे 'वाय'च्या ट्रेलरमध्ये मिळतात. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार? या प्रश्नांची उत्तरं ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.

ट्रेलरमध्ये मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले हे नामवंत कलाकार दिसतात. त्यावरून मराठीतील हा एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचं दिसून येत आहे.

‘ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्तानं हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर यांनी व्यक्त केली आहे. पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर, विराज विनय मुनोत हे कार्यकारी निर्माते आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या